
वाशिम – जिल्हा कृषी महोत्सव योजनेअंतर्गत कृषि प्रदर्शन व मेळावा आयोजन करणेबाबत व फलश्रुती बाबत शासन निर्देशाची अवहेलना झाल्यामुळे या प्रकाराची चौकशी करुन कृषी विभागाच्या दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद आहे की, वाशिम कृषी विभागामार्फत कृषी मेळावा महोत्सवाचे आयोजन केले होते. सदर महोत्सव मालेगाव पंचायत समिती क्षेत्रामध्ये असलेल्या मौजे शिरपूर या गावामध्ये घेण्यात आला. सदर कार्यक्रम जिल्हा मुख्यालयी होणे अपक्षीत असून तशा सुचना, आदेश स्पष्टपणे नमूद असलेला शा.नि. क्रमांक संकीर्ण २०१८/प्र.क्र. २२६/३ ए दि. १६/१०/२०२० निर्गमित केला आहे. या मेळाव्याला उभारण्यात आलेला मंडप व इतर सुविधा अपुर्या होत्या. महोत्सव मेळावा मंडप असुरक्षीत होता. वारा, थंडीपासून संरक्षण पुरेसे नव्हते. स्वच्छतागृह, शौचालय तकलादू होते. सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेतमाल विक्रीकरीता स्टॉल जेमतेम होते. शासन निर्णयामधील अटी शर्तीचे पालन झाले नसुन दुर्लक्ष करण्यात आले. फक्त धार्मिक/ अध्यात्मीक कार्यक्रमाला जमा होणार्या गर्दीचा फायदा उचलण्याकरीता घाईगर्दीने महोत्सव घेण्यात आला. आर्थिक तरतुद रु.२० लक्ष होती असे समजले. प्रत्र्यक्षत सदर तरतूद शेतकर्याला कृषीविषयक, आधुनिक तंत्रज्ञान वापर, शेतमालाची सरळ विक्री पध्दत, मार्गदर्शन याकरीता होती. सदर प्रकरणी आयोजन नियोजन करणारे कृषी विभागाचे अधिकारी यांनी पुरेसे लक्ष न घालता दुर्लक्ष केले. हे का व कसे आणि कशाकरीता हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. कृपया या प्रदर्शनीचा व विक्रीचा किती शेतकर्याला लाभ मिळाला, कितींनी पाठ फिरविली याबाबत स्पष्टता होणे आवश्यक असल्याने सदर प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच बेजबाबदार असलेले अधिकारी व संबंधीत कर्मचारी यांचेवर प्रशासकीय कावाई होणे देखील अपेक्षीत आहे. याबाबत कार्यवाही होण्याची मागणी मनसेने केली आहे.
