दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचा न्यायासाठी एक मार्च रोजी 24 तास बैठा सत्याग्रह: शासनाकडून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार का? (प्रकल्पग्रस्तांचे धरणावर बैल बंडी मोर्च्याचे आयोजन)

      राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर 

गेल्या कित्येक वर्षापासून भिजत घोंगड असलेल्या यवतमाळ वर्धा चंद्रपूर या तीन जिल्ह्यातील दिंदोडा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची दिंदोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 1 मार्च 2023 रोजी बैलबंडी मोर्चा सहित 24 तासाचे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. दि.1 मार्च 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता दिंदोडा प्रकल्प रस्त्यावरती चौकातून शेकडो बैलबंडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले.मोर्चा धरणावर पोहचल्यानंतर जाहीर सभा .रात्रीचा मुक्काम धरणावरच प्रकल्पग्रस्त बंधू भगिनीचा असणार आहे.त्यामुळे प्रकल्पग्रस्त बांधवांनी गावागावातून आपापल्या भोजनाची तयारी करून प्रकल्प स्थळी येऊन 24 तासाचे अनोखे आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
शासन व प्रशासनाला जाग यावी कारण गेल्या कित्येक वर्षापासून दिंडोडा प्रकल्पग्रस्त समिती आपल्या न्याय हक्कासाठी भांडत असून अजूनही शासन प्रशासनाकडून कोणताही तोडगा निघालेला नाही. म्हणून तीनही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी आपापली भाकरी ,झुणका,ठेचा व चटण्याची शिदोरी घेऊन यावे. तसेच गावागावातून भजनी मंडळनी भजनी साहित्य घेऊन यावे. पकवाद, टाळ,पेटी, ढोलकी,डफरी,चोनक सोबत घेऊन बैलगाडी मोर्चा समोर भजन करत व वाजत गाजत जायचे ठरविलेआहे.रात्री भजन, पोवाडा, भारुड सादरी करणं व दुसऱ्या दिवशी 2 मार्च 2023 रोजी सकाळी धरणाचे चारही बाजूने मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. त्यानंतर सकाळी 9.00 वाजता वर्धा /चंद्रपूर जिल्हा ते यवतमाळ जिल्हा नदीपात्रात मानवी साखळी करण्यात ठरविले आहे. याबाबतीत यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव व मारेगाव तहसीलदार तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तहसीलदारांना प्रकल्पग्रस्तांनी निवेदन दिले आहे.
अशा पद्धतीचे हे अनोखे आंदोलन असून याकडे शासन प्रशासन कसे लक्ष घालते याकडे यवतमाळ वर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे लक्ष लागले असून यातून काय निष्कर्ष निघतो याची परिसरात कुतूहलता दिसून येत आहे. तरी ह्या अनोख्या आंदोलनाला शासन प्रशासनाकडून न्याय मिळतो की पुन्हा प्रतीक्षाच याकडे तीनही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त बंधू-भगिनींचे व परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.