रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात महसूल व पोलीस प्रशासन फेल, तालुक्यातील रेती घाटातून हजारो ब्रास रेतीचा होत आहे उपसा

सहसंपादक -रामभाऊ भोयर

जिल्ह्यात यंदा एकाही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना तालुक्यातील असलेल्या रेती घाटातील रेती तस्करांनी हजारो ब्रास रेतीचा उपसा करण्याचा सपाटा लावला असून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात महसूल व पोलीस प्रशासन सबसेल फेल ठरत आहे त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
राळेगाव तालुक्यात मागील वर्षी लिलाव केलेल्या घाटाचे मुदत संपली आहे. मात्र यावर्षी तालुक्यात जुलै ऑगस्ट महिन्यात आलेल्या अति पावसामुळे नद्यांना बऱ्यापैकी येथे रेती आली असतांना रामतीर्थ मोदापूर आष्टा वाऱ्हा आधी घाटातून हजारो रेती ब्रासचा उपसा केला जात आहे. मात्र महसूल प्रशासनाने रेती तस्करी रोखण्याकरिता पथकही नेमले तसेच नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे खोदले तरीही हे रेती तस्कर खड्डे बुजून सुद्धा रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी करत आहे याबाबत राळेगाव येथील रिपाई आठवले गटाचे गोवर्धन वाघमारे यांनी रेती तस्करी थांबवण्यात यावी अशी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच जिल्हा अधिकारी साहेब यांना कळविले असताना सुद्धा रेती तस्करी अद्यापही थांबलेली नाही त्यामुळे वरिष्ठांनी याकडे वेळीच लक्ष देऊन रेतीची तस्करी थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
लिलावासाठी नवे धोरण अडसर.
दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी मध्ये रेती घाटाची लिलाव प्रक्रिया पार पडते मात्र यावर्षी शिंदे फडणवीस सरकार ने रेती लिलावासाठी नव्या धोरणानुसार लिलाव प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे महसूल मंत्र्यांनी सांगितले आहे असे असले तरी वाळू तस्करी रोखण्यासाठी कडक धोरण अवलंबले नाही जुन्या धोरणावर महसूल यंत्रणा पाणी फेरत असल्याचे दिसून येत आहे.