गाव खेडयातील अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून अद्यापही लांबच

       

परीसरातील ग्रामीण भागामधील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनेक लाभार्थी शेतकरी या योजनेपासून अजून सुध्दा वंचित राहिले असून अशा वंचित लाभधारकांना संबंधित महसूल विभागामार्फत किंवा कृषी विभागामार्फत योग्य मार्गदर्शन होत नसल्याने अनेक लाभधारकांना योजनेचा लाभ मिळत नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांना कृषी कार्यालय, तहसील कार्यालय यांच्याकडे फेरफटके मारण्यात आपला वेळ व पैसा व्यर्थ घालावा लागत आहे. खैरी परिसरातील ग्रामीण भागातील अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून कोसो दूर आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकर्‍यांना चांगलीच दमछाक करावी लागत आहे. ही योजना महसूल विभागाच्या दंडाधिकाऱ्यांच्या पासवर्ड खाली उघडली जाते व यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाते. लाभधारक शेतकऱ्यांचे ऑनलाइन केलेला नोंदणी अर्ज व शेतकऱ्यांची काही कागदपत्र अपलोड करावी लागत आहे. परंतु शेतकऱ्यांना कुठे काय करायचे हे माहीत नसल्याने कधी तहसील विभागामध्ये तर कधी कृषी विभागाच्या संगणक चालकाकडे वेळोवेळी खेटे मारून नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परंतु अशा अनेक लाभधारक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करूनही पुष्कळ कालावधी होवून गेला असला तरीही या शेतकऱ्यांना मात्र प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नसल्याने शकडो शेतकरी तहसील, कृषी कार्यालयात खेटे मारीत आहेत. त्यामुळे अशा अनेक शेतकऱ्यांचा पैसा व वेळ वाया जात असल्याने शेतकयांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत संबंधित वरिष्ठांनी लक्ष देऊन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभधारकांची होणारी पायपीट थांबवून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून या वंचीत लोकांची होणारी पायपीट थांबवावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.