
ढाणकी /प्रतिनिधी :प्रवीण जोशी
ढाणकी ग्रामपंचायतची नगरपंचायत होऊन तीन वर्षाचा कार्यकाळ लोटला, परंतु अजूनही ढाणकी शहरात नगरपंचायत च्या दर्जाप्रमाणे, कुठेही विकास झालेला दिसतच नाही. हा विकास केवळ कागदावरच का ? कारण आजही सामान्य ढाणकीकर वेगवेगळ्या समस्यांपासून हवालदिल झालेला असून, ढाणकीकरांच्या कोणत्याच समस्या ह्या सुटल्या नसल्याची ओरड नागरिक करीत आहेत. येथील पाणी समस्या ढाणकीकरांच्या पाचवीलाचं पुजलेली. कारण नगरपंचायत होऊनही पाणी समस्या सुटली नाही. मग यापेक्षा आपली ग्रामपंचायतच बरी ! कारण नगरपंचायत झाल्यानंतर जो टॅक्स लागत आहे, कोणतीही कागदपत्रे बिना टॅक्स भरल्याशिवाय नगरपंचायत कडून मिळत नाहीत. म्हणून ग्रामवासी त्रस्त असल्याकारणाने, ढाणकी नगरपंचायत चा दर्जा रद्द करून, पुन्हा आपली ग्रामपंचायत बरी म्हणून, ढाणकीतील सर्वपक्षीय पदाधिकारी या सर्व समस्यांसाठी एकवटले. व त्यांनी आज दि. १७ जुलै रोजी ढाणकी शहरात उद्भवलेल्या तीव्र पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना करावी. गांजेगांव येथील पैनगंगा नदीवरून येणारी पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करावी. भविष्यात तीव्र पाणीटंचाई होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करावी. शहरातील चिखलमय रस्ते तात्काळ दुरुस्त करावे. बंद असलेले पथदिवे तत्काळ सुरू करावे. शहरातील हातपंप तात्काळ सुरू करावे. शहरातील प्रत्येक प्रभागात नव्याने हातपंपाची निर्मिती करावी. घरकुलाचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे. नगरपंचायतच्या विविध दाखल्यासाठी घेण्यात येणारी घर टॅक्स पावती वसुलीची अट शिथिल करून, जन्ममृत्यू दाखल्यासाठी शोधन फी बंद करावी. नगरपंचायत चा पूर्ण वेळ मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा अभियंता यांची तात्काळ नियुक्ती करावी. शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईला जबाबदार असलेल्या, कर्तव्यात कसूर करणाऱ्या नगरपंचायत चे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी. आणि कचराकुंडी प्रत्येक प्रभागात लावावी. वरील जनहिताच्या मागण्या नगरपंचायत प्रशासनाने लेखी स्वरुपात मंजूर न केल्यास, नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात मुख्य रस्त्यात चक्काजाम करून, ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्याधिकारी नगरपंचायत ढाणकी यांना दिला.
याचबरोबर दिवसेंदिवस शहरात महावितरण कंपनीकडून वीज पुरवठ्याबाबतीत, वीज ग्राहकांना दिला जाणारा त्रास लक्षात घेता व शहरात वारंवार होणारी विजेची ट्रिपिंग, कुठेही वायर तुटल्यास पाच-पाच तास विजेचा पुरवठा खंडित होणे. या महावितरणच्या ढिसाळ कारभाराला त्रस्त होऊन सुद्धा, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी यावर महावितरण ने लवकरात लवकर तोडगा काढावा, जर उमरखेड वरून लाईन बंद झाली तर त्याची पर्यायी व्यवस्था, फुलसावंगी अथवा साखरा येथुन करुन, ताबडतोब शहराला वीज पुरवठा करण्यात यावा. यामुळे पाच पाच तास विजेची वाट पाहण्यास वीज ग्राहकांना ताटकळत बसावे लागणार नाही. आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची कारणे शोधून, मेंटेनन्स चे काम सुद्धा चांगल्या पद्धतीने करून घ्यावे. या मागण्या सुद्धा मान्य न झाल्यास महावितरण कंपनी विरोधात, तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा, या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी, उपकार्यकारी अभियंता ढाणकी व प्रतिलिपी ऊर्जामंत्री महाराष्ट्र, जिल्हाधिकारी यवतमाळ, माहितीस्तव ठाणेदार बिटरगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आला.
यावेळी अमोल तुपेकर शहराध्यक्ष तथा राज्य समन्वयक काँग्रेस, संभा गोरटकर युवा सेना तालुकाप्रमुख, हिरासिंग चव्हाण मनसे नेते, शेख माजीद प्रहार तालुकाध्यक्ष, विशाल इंगळे बजरंग दल जिल्हा संयोजक, विजय वैद्य शिवसेना, जाँन्टी विणकर वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव, भास्कर पा. चंद्रे राष्ट्रवादी शहर प्रमुख, बंटी जाधव शिवसेना शहर प्रमुख, अमोल आरमाळकर शिवसेना, विशाल नरवाडे शिवसेना, शेख अहमद शेख मिरांजी, बापूराव गोपेवाड, मुकुंद जोशी हे सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
