पाऊस लांबल्याने खरीपातील पीके संकटात,सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत

नितेश ताजणे प्रतिनिधी
झरीजामणी

यंदाच्या खरीप हंगामात अद्यापही पाहिजे तसा मोठा पाऊस झालेला नाही. कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी रिमझिम पाऊस पडला, तर काही ठिकाणी जोरदार पावसाने उभी पिके खरवडून नेली.तोही उशिराने आल्याने पेरण्यासही विलंब झाला होता.सध्या पिके बहरत असतानाच मागील १३ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, पिकांनी माना टाकल्या असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.तालुक्यातील परिसरात सध्या दररोज कडक ऊन पडत असून ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही. काही ठिकाणी शेतातील नाले व बंधारे कोरडेच आहेत. मध्यम जमीनीवरील पिकांनी माना टाकल्या असून, चांगल्या प्रतीच्या जमिनीवरील पिके थोडीशी तग धरून आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते व औषधे यावर हजारो रुपयांचा खर्च केला आहे.
झरी तालुक्यात सर्वाधिक पेरा हा कापूस,सोयाबीन, तूरीचा आहे. तर मुगाचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे ते शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पिकांना जगवण्याची धडपड करीत आहेत.सोयाबीन सध्या फुले आली असून, त्यावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा उपलब्ध नाही ते शेतकरी हताशपणे वाळणाऱ्या पिकाकडे बघत आहेत. एकीकडे पिके वाळत आहेत तर दुसरीकडे पीक जगण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र आहे.

पाऊस न पडल्यास पिके संकटात

येत्या तीन चार दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तर पिके हातची जातील. हजारो रुपये खर्च करून पेरलेले बी-बियाणे, पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाकडून मदतीची अपेक्षा असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे.

पुढील काही दिवस पाऊस लांबण्याची शक्यता

राज्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारली आहे. राज्यात मान्सून यंदा उशीरा दाखल झाला. परंतु त्यानंतर जुलै महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात तर अतिवृष्टी झाली. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या पावसाचा जोर कमी झाला. पुढील काही दिवस राज्यात पाऊस नसेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यात कुठे पावसाचा अलर्ट दिला नाही.

कृषी विभागाचे आवाहन

झरी तालुक्यातील मागच्या वर्षी ची परिस्थिती पाहता यावर्षी खरीप हंगामात अनेक भागात सोयाबीन पिकावर रोग पडला आहे. सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पन्नात 15 ते 75 टक्केपर्यंत घट होऊ शकते. शेतकऱ्यांनी वेळीच या रोगाला ओळखून पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून रोगाचे व्यवस्थापन करावे, तसेच काही अडचणे आल्यास गावापातळीवर कृषिमित्र, कृषी सहाय्यक यांचेकडे सम्पर्क करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल आमले यांनी केले आहे.