केबल चोरीचा काही तासातच छडा ,शिरपूर पोलिसांची जबरी कारवाई

वणी उपविभागात येणाऱ्या शिरपूर पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे दिसते आहे. वेकोलिच्या नायगाव कोळसा खाणीतून तांब्याची केबल चोरीच्या घटनेचा शिरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच छडा लावला. पोलिसांनी हनुमान नगर येथुन आरोपी अमोल हिरामण रामटेके (38) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी गेलेली 25 फुट तांब्याची केबल किंमत 20 हजार रुपये व चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल किंमत 25 हजार रुपये असा एकूण 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नायगाव कोळसा खाणीतील सिक्युरिटी इन्चार्ज म्हणून हनुमान महादेव काकडे यांनी मंगळवारी 22 ऑगस्ट रोजी शिरपूर पोलिसात केबल चोरी गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भादंवी कलम 379 प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध रात्री 11 वाजता गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार ठाणेदार गजानन करेवाड यांनी सहकार्याच्या मदतीने शोध कार्य सुरू केले. त्यातच गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून सदर गुन्ह्यात आरोपी अमोल हिरामण रामटेके (38) रा. हनुमान नगर हा निष्पन्न झाल्याने त्यास अटक करून त्याच्या कडून गुन्ह्यात गेला माल अंदाजे 25 फूट इलेक्ट्रिक केबल किंमत 20 हजार तसेच गुन्ह्यात वापरली मोटर सायकल किंमत 25 हजार असा एकूण 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, हेकॉ/सुनिल दुबे, निलेश भुसे,गजानन सावसाकडे,विजय फुलके यांनी केली आहे.