
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
महागाव गेल्या दोन – तीन दिवसापासून महागाव तालुक्यातील करंजखेड, लेवा, खडका परिसरात शेत शिवारात बिबट्या चा मुक्त संचार वाढल्याने शेतातील पिकाच्या राखणी करिता शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे महागाव वनपरिक्षेत्र विभागामार्फत या बिबट्याचा बंदोबस्त होण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. दोन दिवसाआधी करंजखेड, सेवानगर, कासारबेहळ या ठिकाणी बिबट्याचा इतरत्र शेत शिवारात वावर होत असल्याचे अनेक शेतकऱ्यांच्या लक्षात आले. सध्या सोयाबीन, उडीद, मूग, पिकांची वन्य प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्यामुळे, ती होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना रात्री अप रात्री जीव धोक्यात घालून शेत पिकांची राखण करावी लागते. अशाप्रकारे राखण करीत असताना स्वतःचे रक्षण ठिकाण रात्रीच्या वेळी सुरक्षितता राहण्यासाठी लाकडी मळा उंच ठिकाणी वास्तव्या करीता बनवावा लागतो. त्या वर आपले बस्तान मांडून, जीव मुठीत घेऊन रात्रीच्या वेळेला जागल करावी लागते.नुकतेच करंजखेड येथील गजानन राऊत हे रात्रीच्या वेळेला आपल्या शेतामध्ये वन्य प्राण्यांपासून पिकाची राखण करण्यासाठी शेतामध्ये गेले होते. रात्रीचे दरम्यान बनविण्यात आलेल्या मळ्यावर उंचीच्या ठिकाणी जागल करीत असताना, बिबट्याचा म्हशीच्या वघारीची शिकार करीत असल्याचा सुगावा लागताच स्वतः घाबरून गेले. आणि फोन द्वारे गावातील युवकांना सूचना केली. यावेळी गावातुन आलेल्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकली. सध्या परिसरात शेतीचे कामे चालू असून शेतकऱ्यां मध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची पार झोप उडाली आहे. आठ दिवसाआधी याच परिसरातील एका युवकाने वन्य प्राण्यांचा हौदोस वाढल्याने त्रस्त होऊन, वन विभागामार्फत वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होत नसल्याने स्वतःच विष प्राशन करण्याचा वन विभाग कार्यालयात प्रयत्न झाला होता.
परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने तो प्रसंग टळला. एकंदरीत वन्य प्राण्याच्या त्रासाने जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना जागल करावी लागते. अशातच दोन दिवसात बिबट्याचा या परिसरात मुक्त संचार वाढल्याने भीती निर्माण झाली आहे. चार दिवसापूर्वी खडका शेत शिवारात बिबट्या च्या पायाचे पंजे जमिनीवर उमटल्याच्या खुणा आढळल्या आहेत.
महागाव वनपरिक्षेत्र विभागाने याबाबत ठोस उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी परिसरातील शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
वनविभाग मात्र गप्प !
करंजखेड, लेवा, खडका या परिसरात या अगोदरही अनेकदा अस्वलाचे शेतकऱ्यांना दर्शन झाले आहेत. यांची माहीती त्यांनी भ्रमनध्वनीवरुन वन विभागाला दिली. यावर उपाययोजना करण्याऐवजी वन विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे परिसरातील नागरिकांत रोष निर्माण होतांना पहावयास मिळत आहे.
तातडीने बिबट्याचा बंदोबस्त व्हावा !
करंजखेड, लेवा, खडका परीसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकरी शेतशिवारांत जाण्याकरीता घाबरत आहेत. त्यामुळे वन विभागाने तातडीने अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जिल्हा परीषद सदस्य अनिल भगवानराव नरवाडे यांनी केली आहे.
