भवानी (ज) नागरिकांनी अवैध व्यवसायाच्या विरोधात घेतला ग्रामसभेत ठराव , उप.वि. पो. अधिकारी यांच्या कडे महिलांनी कैफियत मांडली


माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव


उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील पोलिस स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दराटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गावात अवैध व्यवसायाने उच्छाद मांडला असल्याने, पोलिस ठाण्यात तोंडी सुचना देऊनही थकलेल्या महिला व नागरिकांनी चक्क हे अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामसभेचा ठरावच घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी यांना हे व्यवसाय बंद करण्यासाठी साकडे घातले आहे.
दराटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भवानी (ज) येथे अवैध व्यवसाय जोरात सुरू असल्याने व हे अवैध व्यवसायीक कुणालाच जुमानत नाहीत, रहदारी च्या रस्त्यावर जुगार, मटका चालतो तर गावठी दारू विक्रीही व्यवसायीकांच्या रहात्या घरी विक्री होते. त्यामुळे दारु ढोसायला येणाऱ्या तळीरामाच्या अभद्र वागण्याने आजु बाजूला रहाणाऱ्या नागरिक व महिलांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ते त्रस्त झाले आहेत. यामुळे या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी दि. ११/०९/२३ रोजी झालेल्या ग्रामसभेत गावात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले मटका, जुगार, गावठी दारू कायम बंद करण्यासाठी सर्वानुमते ग्रामसभेत ठरावच घेतला आहे.
सदरचा ठराव व निवेदन देण्यासाठी महिला उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या दालनात जाऊन त्यांनी आपबिती साहेबांन समोर मांडली, या दारु, मटका व जुगार च्या व्यसनाच्या आहारी जाऊन तरुण पिढीचे आयुष्य व्यसनाधीन होऊन बरबाद होत आहे तर प्रौढ पुरुष व्यसनाच्या आहारी जाऊन घरी भांडणे करुन महिलांनी रोज-मजुरी करुन आणलेल्या पैश्यातुन आपले व्यसन पुर्ण करण्यासाठी पैशाची मागणी करतात त्यांची मागणी पुर्ण नाही झाली तर महिलांना मारहाण करतात अशी कैफियत मांडली. प्रदीप पाडवी साहेबांनी महिलांचे सर्व म्हणणे शांत ऐकुन घेतले व येत्या सात दिवसात या सर्व अवैध व्यवसायाचा कायम बंदोबस्त लावण्याचे आश्वासन दिले असे महिलांनी सांगितले आहे.
_

दराटी ठाणेदाराच्या वल्गने ची पोल खोल


दराटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय बंद असल्याच्या वल्गना देणाऱ्या ठाणेदाराच्या दाव्याची पोल खोल झाली आहे. दोन महिन्यांत अवैध व्यवसायीकांन वर ३७ कारवाया केल्याची माहिती वृत्त पत्रांना देऊन आपण किती कर्तव्य दक्ष आहोत हे दाखवून पाठ थोपटुन घेणारे ठाणेदार येत्या सात दिवसात दराटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत चालु असलेले अवैध व्यवसाय कायम बंद करतात का? याकडे नागरीकांच्या नजरा लागल्या आहेत.