बस अभावी विद्यार्थ्यांची पायपीट, राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील कळमनेर हे गाव राळेगाव ते वर्धा, हिंगणघाट मार्गावर असून राळेगाववरून सात किलोमीटर अंतरावर आहे.कळमनेरचे विद्यार्थी चौथ्या वर्गापर्यंत गावात शिक्षण घेत असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना राळेगावला यावे लागते. राळेगाव ते कळमनेर या मधील अंतर सात किलोमीटर असल्याने विद्यार्थी एवढं अंतर पायदळ चालून जाऊ शकत नाही. या गावचे बसस्थानक रोडलाच लागून असून या मार्गाने राळेगाव, वर्धा, हिंगणघाट डेपोच्या अनेक बसेस धावत असतात त्यामध्ये बऱ्याच बसेस गावांचा थांबा घेत जाण्याचे आदेश असणाऱ्या असून सुद्धा एकही बसेस थांबत नाही.अशातच शाळेची,विद्यालयाची,महाविद्यालयाची वेळ बहुतांश अकरा ते पाच वाजेपर्यंत असून बऱ्याच महत्त्वाच्या तासिका अकरा ते बारा वाजेपर्यंत असतात. विद्यार्थी बसची वाट पाहत असतानाच बस थांबेल या अपेक्षेने बरेचदा बारा कधी जास्त कधी कमी वाजत असल्याने या गणित, इंग्रजी विज्ञान अशा तासिकांना मुकावे लागत असून असा प्रकार एक दिवस नाही तर सातत्याने होत असून आम्हाला या बस चालक,बस वाहकांच्या हेकेखोरपणामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली असून एकीकडे शासन शिक्षणावर लाखो करोडो रुपये खर्च करत असताना हा परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा हेकेखोर पणा कशासाठी असा प्रश्न कळमनेरवासी करीत आहे.सोबतच राळेगाव पासून सात किलोमीटर कळमनेर गाव असून बरेचसे कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे,मजूरीसाठी जाणारे लोकं सुद्धा बसची वाट पाहत असतात. या बसच्या आणि बस चालक वाहकाच्या हेकेखोरपणामुळे कळमनेरवासियांनी आपली समस्या डेपो मॅनेजर यांच्याकडे तोंडी स्वरूपात मांडली असता त्याचा परिणाम काहीही झाला नसून विद्यार्थ्यांचे एकेक दिवस महत्वाचे वाया जात असल्याने अखेर या सर्व गोष्टींना कंटाळून कळमनेर वासियांनी सरपंच सौ. निता राऊत उपसरपंच नारायण इंगोले यांच्या सह अनेक गावकऱ्यांच्या सह्याचे लेखी स्वरूपात निवेदन वाहतूक नियंत्रक राळेगाव यांच्या कडे दिले असून बस थांबा नियमित न झाल्यास वेळप्रसंगी कळमनेर येथील विद्यार्थी गावकरी परत निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा कळमनेर येथील जनतेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.