जेवली येथील पांदण रस्त्याचे वाजले तीन तेरा ( शेतशिवारातून शेतीचा माल घराकडे कसा आणावा यामुळे जेवली या गावातील शेतकरी चिंताग्रस्त )


बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी:: शेख रमजान

उमरखेड तालुक्यातील जेवली या शेतशिवारात शेतकऱ्यांचा शेतमाल घरी सुखरूप पोहचावा म्हणून शासनाने पांदन रस्ते बनविण्याचा उपक्रम राबविला होता. बहुतांश ग्रामीण गावामध्ये उत्कृष्ट पांदण रस्ते झाल्यामुळे खूप शेतकरी सुखावले आहेत. परंतु जेवली हे गाव ग्रामीण बंदी भागात असल्यामुळे कंत्राटदाराने मजा मारून घेतली आहे. ठेकेदाराला असा भ्रम होता की आपण थातुर मुतुर काम करून रुपये कमावून घेण्यास काहीच हरकत नाही. कारण या बंदी भागामध्ये कोणताही अधिकारी फिरकूनही पाहणार नाही. आणि तो ठेकेदाराचा अंदाज खरोखर ठरला आहे. संबंधित विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी पांदण रस्त्याकडे विशेष लक्ष न दिल्यामुळे ठेकेदारांनी स्वतःचे खिसे गरम करून घेतले व रस्त्याअभावी शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. जेवली या गावाकाठी नाल्याच्या बाजूला पांदण रस्ता बनवण्यात आला होता. या पांदन रस्त्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नसल्यामुळे किंवा त्यांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेमध्ये कंत्राटदारांनी शेतकऱ्यांना येडू- बेडू बनवून बोल्डर गिट्टी च्या बदल्यात विहिरीचा कच्चा मुरूम टाकला, कुठे –कुठे काळीच्या मातीचा थर अंथरून त्यावर बिना पर्वाना माती मिश्रित विहिरीचा छोटा मुरूम टाकून रोलर फिरवण्यात आले. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पांदण रस्ते चकाचक दिसू लागले होते. काही दिवसातच पावसाळ्याला सुरुवात होताच निकृष्ट दर्जाचे दगड व मुरूम वापरल्यामुळे पांदण रस्ता पाण्यामुळे खरडून गेला आहे. व जागोजाग मोठे मोठे खड्डेही पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून शेतमाल आनणे सोडूनच द्या तर शेतामध्ये पयदल जाणे येणे सुद्धा करता येत नाही. म्हणून जेवली या गावांमध्ये शेतकरी शेतीचा शेतमाल घरी कसा आणावा या चिंतेत अडकलेला आहे. शेतकऱ्याचा मायबाप कोणीच नाही असे जेवली येथील शेतकरी बोलत आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पांदण रस्त्याची तात्काळ पाहणी व चौकशी करून निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या कंत्राट दारावर कठोर कारवाई करून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी विनवणी करताना कास्तकार दिसत आहेत…