कपाशीला यंदा तरी भाव मिळेल का?
केंद्रातील व महाराष्ट्रातील मायबाप सरकार शेतकऱ्यावर लक्ष देतील काय?

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

कापूस अर्थातच कपाशी हे पीक महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा, तसेच इतर राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. कापसाला पांढरे सोने म्हणूनही ओळखले जाते. तर यवतमाळ जिल्ह्याला “कॉटन सिटी” असे संबोधिल्या जाते. गेल्या हंगामात कापसाला अपेक्षित असा भाव मिळालेला नाही. यंदा तरी कापसाला चांगला भाव मिळेल का हा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात नवीन हंगामातील कापूस बाजारात येऊ लागला आहे. परंतु ज्याप्रमाणे गेल्यावर्षी मुहूर्ताच्या कापसाला विक्रमी भाव मिळाला होता तसा भाव यंदा कुठेच मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी सुरू आहे. पण खाजगीमध्ये कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाही. दरम्यान आता रब्बी हंगामाला येत्या काही दिवसात सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांना भांडवलासाठी पैशांची गरज आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी म्हणजेच लवकर कापसाची पेरणी केली होती ते शेतकरी बांधव कापसाची वेचणी करून थेट कापूस विक्रीसाठी बाजारात नेत आहेत. काही ठिकाणी खरेदी सुरू आहे. खेडा खरेदीच्या माध्यमातून स्थानिक खाजगी व्यापारी कापसाची खरेदी करत आहेत. भाव मिळेल यावरच कापसाचे संपूर्ण गणित अवलंबून राहणार आहे. तूर्तास मात्र राज्यातील काही बाजारात कापसाची थोड्याफार प्रमाणात आवक होत आहे. या मालाला किमान 7300, कमाल 7350 आणि सरासरी 7330 एवढा भाव मिळाला होता. शेतकऱ्यांची कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा आहे. यामुळे आता भविष्यात शेतकऱ्यांच्या अपेक्षेएवढा भाव मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.