ग्रामीण भुसार व्यापारी व दलाल शेतकऱ्यांची करीत आहेत मुंडकेमोडी,
( एक किलो कट्टी एक किलो धारा, व्यापारी व दलालाच्या फायद्यासाठी ठार मरतोय शेतकरी बिचारा )

प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु )

उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या सोयाबीन, उडीद, मूग शेतकऱ्यांकडून झपाट्याने विक्री सुरू आहे. हल्ली रब्बी पीक पेरणीची लगबग अतिशय जोरात सुरू असल्यामुळे व दिवाळीचा सर्वात मोठा सण आल्याकारणाने संपूर्ण शेतकरी वर्ग आपल्या शेतातील झालेला माल विकण्यासाठी भुसाव व्यापारी व बगर लायसनी फिरत्या दलालाकडे गर्दी करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना शेतमाल विकल्याशिवाय पर्याय नाही म्हणून भुसार व्यापारी व दलाल शेतकऱ्यांचा माल कवडीमोल घेऊन शेतकऱ्यांची मुंडकेमोडी करीत आहेत. कोणत्याही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याकडे सोयाबीन विक्री केली असता एका क्विंटल ला 1 किलो 500 ग्राम कट्टी, एक किलो धारा, हमाली, काटा भाडे व चांगल्या सोयाबीनमध्ये माती आहे म्हणून 2 किलो कट्टी एकंदरीत पाच ते सहा किलो कट्टी करून शेतकऱ्यांना टोपी लावण्याचे काम व्यापारी व फिरते दलाल करीत आहेत. ग्रामीण बंदी भागातील शेतकऱ्यांना सर्वात पहिले नदी नाल्याच्या पुरामुळे शेती खरडून गेली याचा जबर फटका बसला. नंतर येलो मोजाक या रोगाचा थैमान तितकेही सहन करून शेतीतील जितका शेतमाल उरलेला विकण्यासाठी नेला तर व्यापारी व गावोगाव फिरते दलाल या सर्वामुळे ग्रामीण बंदी भागातला शेतकरी वर्ग मोडकुटीस आला आहे. शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या टॅक्स वर ज्या नोकरदारांच्या पगारी होतात त्यांना मात्र शेतकरी मरो वा वाचो काहीही घेणेदेणे राहिलेले दिसत नाही. भुसार व्यापारी यांच्या वजन काट्याची तपासणी करा, भावनियंत्रण अधिकाऱ्यांनी सुद्धा ग्रामीण बंदी भागाकडे एखाद्या वेळेस फिरकले पाहिजे. नाहीतर पिढी दर पिढी सरकार, शासन, व्यापारी, दलाल, सावकार हॆ शेतकऱ्यांचे नेहमी आर्थिक नुकसान करत आले आहेत. यात तीळ मात्र ही शंका उरलेली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांची वजन काट्यामध्ये फसवणूक होऊ नये, एका क्विंटल मागे 5 ते 6 किलो कट्टी का घेतात, सुति पोते बारदाना व लाईलोन खताच्या पोत्याची एक सारखीच कट्टी का घेता, हे विचारण्याकरिता किंवा तपासणी करिता कोणताही शासकीय अधिकारी ग्रामीण बंदी भागामध्ये येत नसल्यामुळे भुसार व्यापाऱ्यांची व दलालांची मजाल वाढली आहे. तरी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण बंदी भागात विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करून लूट करणाऱ्या भुसार व्यापाऱ्यावर व फिरते शेतमाल घेणाऱ्या दलालावर कार्यवाही करावी व शेतकऱ्यांची लूट थांबवावी एकच सूर तमाम ग्रामीण बंदी भागातील शेतकऱ्यांचा ऐकण्यास मिळत आहे…