खैरी जल उपसा जल सिंचन या योजनेतील शेतक-यांना कर्जमुक्ती द्या : शेतकऱ्यांचे आमदार उइकेंना निवेदन
(२३ वर्षापासून शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली)

आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्या मधील राळेगाव तालुक्यातील खैरी येथील खैरी उपसा जलसिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्यामुळे या योजनेमधील शेतकरी मागील २३ वर्षापासून कर्जाच्या ओझ्याखाली दबले असून ते इतर सोयी सुविधा पासून वंचित झाले असल्यामुळे या योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी म्हणून या मागणीचे निवेदन खैरी येथील शेतकऱ्यांनी राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा डॉ अशोक उईके यांना दिले.
राळेगाव तालुक्यातील खैरी उपसा जल सिंचन संस्था र.नं. १२२९ खैरी येथील शेतकऱ्यांनी यवतमाळ मध्यवर्ती सह. बँक शाखा खैरी येथून सिंचनाकरीता सन २०००-२००१ मध्ये दिर्घ मुदती कर्ज घेतले होते. संबंधीत योजना संपुर्ण कार्यान्वित न झाल्याने त्यापासुन शेतकऱ्यांना कुठलाही लाभ घेता आला नाही. परीणामी त्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांचा सातबाऱ्यावर अद्यावत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना शेती उपयोगी मिळणा-या अल्पमुदती कर्जापासुन व इतर लाभापासुन वंचीत ठेवण्यात आले आहे. सततची नापीकी, भावबाजी, निसर्गाचा प्रकोप, मुलाबाळांचे शिक्षण, लग्न यासारख्या अनेक समस्यांना आज शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. सातबाऱ्यावर बोझा असल्याने गरजेनुसार आर्थीक व्यवहार सुध्दा बंद झाले आहे. हया सगळया ओढावलेल्या परिस्थीतीमुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. सदर सिंचन योजना सुरु होण्यापूर्वीच बारगळली व शेतकऱ्यांचे जनजिवन विस्कळीत झाले व शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढतच गेला.
यापूर्वी भाजपा ,शिवसेना सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिलेले होते. त्यावेळी सरकारच्या या सातबारा कोरा ब्रीदवाक्याकडे खैरी येथील उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले होते परंतु या योजनेतील शेतकऱ्यांचा सातबारा अजून पर्यंत कोरा झालेलाच नाही. या योजनेतील शेतकऱ्यांचा सातबारा आज ना उद्या कोरा होईल ह्या आशेवर हे शेतकरी जगत असून ह्याचे केव्हा मरणात रूपांतर होईल हे सांगणे कठीण आहे? तशीही ह्या योजनेतील बरेच शेतकरी कर्जाचे ओझं घेऊन मरण पावले आहे परंतु कर्जाचा ओझा काही कमी झालं नाही. आता त्यांच्या वारसाचाही नंबर येतो की काय असे ह्या योजनेतील शेतकरी बोलताना दिसत आहे.
आधीच यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त असून ह्या आत्महत्या थांबविणे अगत्याचे आहे. मागील 23 वर्षापासून खैरी उपसा जलसिंचन योजनेतील शेतकरी हे कर्जाच्या ओझ्याखाली दबले असून ही योजना पूर्णत्वास न गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यावर कर्जाचे ओझे वाढले आहे. ह्या योजनेतील बरेचसे शेतकरी मृत पावले असून त्या कर्जाचे ओझे त्यांच्या वारसावर सुद्धा चढले आहे. तेव्हा या खैरी उपसा जलसिंचन योजनेमुळे मेटकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या वरील सर्व बाबींची गांर्भीयाने दखल घेवुन खैरी येथील सर्व शेतकरी सभासदांना शासनाने छोटासा दिलासा देत आमचा “सातबारा” कोरा करावा व आम्हाला या कर्जाच्या ओझ्यातुन कायमचे मुक्त करावे व आम्हाला नियीमत करुन अल्पमुदती कर्ज देण्याचे करावे या मागणीची निवेदन खैरी येथील शेतकरी व या योजनेतील मृत शेतकऱ्यांचे वारस यांनी राळेगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रा डॉअशोक उईके यांना दिले.
. यावेळी निवेदन देताना खैरी उपसा जलसिंचन योजनेचे शेतकरी व मृत शेतकऱ्यांचे वारस, रवींद्र उर्फ बाळासाहेब खैरकर,विशाल पंढरपुरे, विलासराव सरोदे, किसनराव इंगोले ,नत्थूजी सरोदे, मनोहर महाजन, बालू उर्फ प्रमोद राऊत, मनोज कोचर, धीरज कोचर, ज्ञानेश्वर खैरकर, अतुल सरोदे यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.ल