शकुंतला’ ब्रॉडगेजचा अर्धा खर्च राज्य सरकार उचलणार

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शकुंतला रेल्वे ब्रॉडगेजचा अर्धा खर्च उचलण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केली. खा. भावना गवळी यांनी हा प्रश्न सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला होता. राज्य सरकारने ब्रॉडगेज प्रकल्पाचा अर्धा खर्च उचलण्याचा निर्णय घेतल्यामुळे खा. गवळी यांच्या मागणीला यश आले आहे.

विशेष म्हणजे माहुर शक्तीपिठाला जोडणारा वाशीम, आदिलाबाद हा रेल्वेमार्ग व्हावा, ही सुद्धा मागणी खा. गवळी यांनी केली होती. या मार्गाचा सुद्धा अर्धा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. विदर्भात मुबलक पिकणारा कापूस मुंबई मार्गे मँचेस्टरकडे नेण्याच्या मूळ उद्देशाने ब्रिटिशांनी यवतमाळ ते मुर्तीजापूर हा नॅरोगेज रेल्वेमार्ग उभारला. पुढे या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. मध्य रेल्वेने प्रवासी रेल्वेची जवाबदारी स्वीकारली आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ मार्गावर शकुंतलेचा प्रवास सुरू झाला. शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी खासदार गवळी यांनी पाठपुरावा या सुरूच ठेवला होता. या संदर्भात मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून त्यांचे लक्ष वेधले होते. सदर रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी रेल्वे मंत्रालयाने २१०० कोटींच्या खर्चाला मान्यता दिली. मूर्तिजापूर-यवतमाळ ही रेल्वे दहा वर्षापूर्वी बंद करण्यात आली. अनेकदा नागरिकांनी आंदोलन करुन शकुंतला सुरू करण्याची मागणी केली. मात्र ट्रॅक सुस्थितीत नसल्यामुळे ही रेल्वे पुन्हा सुरू झाली नाही. आता मात्र यवतमाळच्या खा. गवळी यांनी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करुन या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळेच आज झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील निर्णयामुळे यश प्राप्त झाले आहे. या मार्गासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. पैसा उपलब्ध झाल्यास लवकरच ब्रॉडगेजचे काम सुरू होणार आहे. यवतमाळच्या जनतेला मुंबईला जाण्यासाठी ४५ किलोमिटर दुर धामणगाव येथे रेल्वेस्टेशनवर जावे लागते. हा मार्ग तयार झाल्यास यवतमाळकरांची फरफट थांबणार आहे. याशिवाय सर्वाधिक कापूस पिकविणाऱ्या या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कापूस परप्रांतात जाऊ शकणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शकुंतलेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर अत्यंत महत्वाचे आणि फायद्याचे ठरणार आहे.