
‘ आजकल मैं राशन की कतारो में नजर आता हूं,
अपने खेतो से बिछडने की सजा पाता हूं ‘
-गावं सोडून शहरात गेलेल्या चाकरमानी माणसाच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात गावं वसलेला असतो. ‘शेती ‘ सोडल्याची सजा ‘राशन ‘ च्या कतारीतच प्रत्येकाला मिळेल असे जरुरी नाही. ती रांग नोंटबंदी रुपी देखील असू शकते. तात्पर्य हे की वरील ओळीतील आशयानुरूप मनाची चलबिचलं होते खरी.मात्र दुसरीकडे बदलाचे वारे असे सुसाट निघालेत की त्या मुळे गावाचा देखील चेहरा -मोहरा बदलला आहे.गावाचा पार राहिला नाही, नदीचा घाट राहिला नाही, आपुलकीची वहीवाट राहिली नाही.गावागाड्याची वीण उसवली, स्लॅबची घर आली आणि सिमेंटच्या जंगलात गावं हरवलं. हळूहळू काही गोष्टी नामशेष व्हायला लागल्या.याच सदरात मोडणार कौलारू घर. ते देखील गावातून दिसेनास झालं आहे आताशा.
पूर्वी गावात एकजात कौलारू घर असायची. जातीच्या चौकटी घट्ट असतीलही मात्र कौलारु घर हा समतेचा जणू निदर्शक असावा असा गावं दुरून दिसायचा. दोन अर्धवट बंद मुठीच्या आकाराची बारीक कवेलू छाकारलेली घर ही गावाची ओळख होती. साठ ते सत्तर च्या दशकात जन्मलेल्या पिढीच्या अनेक आठवणी या कौलारू घराशी निगडित आहेत.
आरोग्याच्या दृष्ठीने बारीक कौलारू घरे ही अंत्यत उपयुक्त असल्याची मान्यता आहे. त्यात मातीच्या रुंद भिंतीचा आधार . ही घरे खरं तर नैसर्गिक ए. सी. चे कामं करायची, आणि तो ही पर्यावरणपूरक तथा शरीराला लाभदाई. मातीचे घर त्यावरील कौलारू छत ही घरे उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम राहायची.आज उन्हाळ्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या वरच राहात असल्याने जीवाची लाही -लाही होत असतांना या कौलारू घरांची आठवण झाल्याखेरीज राहात नाही. आधुनिक काळात सुविधा आल्या पन निरामय आरोग्य हरवलं त्याची अनेक कारण असतील पन एक कारण सिमेंटच्या घरातील वास्तव्य हे देखील आहे . शरीराच्या एका -एका अवयवासाठी एक – एक डॉक्टर अशी चैन परवडणारा वर्ग तयार झाला आहे. यालाच तथाकथीत विकास वैगरे म्हटल्या जाते. पण जेव्हा बी. पी.सुगरादी ऱीपुंना ठोकरून लावत 80 / 90 वर्ष ठणठणीत काढणारी जुन्या पिढीची माणसं पाहिली की आपल्या गृहीतकाला हादरे बसतात.शुद्ध हवा, विषमुक्त अन्न , या सोबतच कौलारू घरे हे देखील त्या निरामय आरोग्याचे एक कारण असल्याचे बोलल्या जाते.
आज -आत्ता -ताबडतोब चा इन्स्टंट जमाना आलाय, या काळात देखभालीच्या दृष्टीने कौलारू घरे परवडेनाशी होणार होतीच, ती झाली. उन्हाळा संपत आला पावसाळ्याची चाहूल लागली की कौलारू घराचे कामं करावे लागायचे. याला घर फेरणे असे काहीसे नाव होते. बारीक ताटवा अंथरायचा त्यावर आधीची कवेलू काढून ठेवायची जुना तटवा इंधन म्हणून उपयोगी पडायचा. फुटलेली कवेलू बदलून घ्यायची घर शाकारायाचे, नंतर भिंती छापून घायच्या वर्षभराची सोय व्हायची. घर नवे दिसायचे. आता कौलारू घरेच राहिली नाही तर घर फेरणारे कुठून राहणार ? कौलारू घरा सोबतच घर फेरणारी पिढी देखील नामशेष झाली आहे. ही कला काळाच्या ओघात संपुष्ठ|त आली आहे . चार -पाच दशका आधी बारीक कवेलूच्या ऐवजी लांबी -रुंदी अधिक असणारे इंग्रजी कवेलू आले. त्यांची निगा राखणे काहीसे सोपे होते. पण जास्त काळ टिकले नाही. त्या पेक्षा टिनपत्रे बरे असा विचार करून उन्हाच्या काहीलीला घरात ओढून घेण्याची कवायद काही जणांनी केली.
आता लाकडाची घर बनवायची नवी टूम निघाल्याची चर्चा आहे. जापानचे मॉडेल भारतात घेऊन यायच्या वलग्ना होताहेत. भुकपंप्रवण जपानमध्ये तो प्रकार उपयुक्त असेलही. मात्र हंगर इंडेक्स मध्ये विक्रम करायच्या लाजिरवाण्या पातळीवर असणाऱ्या देशातील नागरिकांना तो खर्च पेलवेल का. घर एकदाच बनत या ठाम गृहीतकाला कवटाळून बसणाऱ्याना हे जमेल का हा प्रश्नच आहे. ईळ्याचा खिळा करण्याची आपली सवय काही जात नाही. कौलारू घरे काही परत आता येत नाही असे म्हटल्यास अतिशोक्ती ठरू नये.
