
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
नवोदित आदिवासी साहित्य परिषद आणि जिज्ञासा बहुउद्देशीय संस्था यवतमाळ आयोजित चौथी नवोदित आदिवासी साहित्य परिषदेचे रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते, प्रा. वसंत कनाके, संमेलनाचे उद्घाटन फडकी मासिकाचे संपादक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय लोहकरे यांनी केले, तर या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमुद केले, की हजारो वर्ष आदिवासी बांधवांनी आपल्या वाणीने, गीत गायनाने आणि मौखिक परंपरेने जे जतन करून ठेवले आहे तीच खरी आदिवासी साहित्याची गंगोत्री आहे. ती ‘लोकवाणी आणि लोकगीतांची गंगोत्री पटवून देण्यासाठी त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करण्याची पद्धती, सासूने सुनेचे आणि जावयाचे केलेले वर्णन, आदिवासींचा पुनर्जन्मावर नसलेला विश्वास, मुसळधार पाऊस, सात वाकडी, जंगलचा राजा आणि दुष्काळातही होणारा भ्रष्टाचार या सर्व गोष्टींना आदिवासींनी कशा मौखिक उपमा दिल्या आहेत, त्याबद्दल विविध लोकगीतांचे दाखले देत पटवून दिले. पुढे डॉ. रोंगटे म्हणाले, की ज्याने प्रथम मद्याचा, पद्याचा आणि गद्याचा शोध लावला तो आदिवासी. एवढेच नव्हे तर जिने प्रथम शेतीचा शोध लावला ती आदिवासी. जो पहीला संशोधक, पहिला शास्त्रज्ञ पहिला विधिज्ञ, पहिला वास्तुविशारद, पहिला शल्यचिकिस्तक, पहिला चित्रकार एवढेच नव्हे तर, आपल्या डोक्यावर प्राण्यांची शिंगे धारण करून प्राणी माणसळणारा, कुलचिन्हांचे पालन करणारा अशी मौखिक संपदा जोपासणाऱ्या आदिवासींचा खऱ्या अर्थाने सन्मान व्हायला हवा मात्र तो न होता त्याला अभिजात साहित्याने केवळ लोकसाहित्याच्या पेटार्यात बंदिस्त करून ठेवले. त्यामुळे आपली मोठी हानी झाली आहे असे सांगून त्यांनी वास्तव गोष्टींकडे सर्वांचे लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, आदिवासीनी सुवर्णाक्षरांनी लोकसाहित्याची मौखिक नाममुद्रा उमटवली असली, तरी अशा लोकसाहित्यावर आदिवासींच्या ऐवजी बिगर आदिवासींचा कब्जा कसा? असा रोखठोक सवाल करून सर्व उपस्थितांना अंतर्मुख केले.
