बुद्ध पौर्णिमेला आदिवासी हजारो भाविकांनी लावली हजेरी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आदिवासी बांधवांची पंढरी व काशी म्हणून राळेगाव तालुक्यातील जागजई गावाची ओळख आहे. गुरुवारी बौद्ध पौर्णिमेला जागजाईला मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत 35 ते 40 हजार भाविक बांधवांनी येथे हजेरी लावली. पेरसापेन, भीमलापेन, राव, मानको, काळाचौरव, पांढराचौरव, तोडोबा कल्यासुर अशा अनेक देवतांचा वैशाख स्नानाचा हा पवित्र दिवस असतो. वर्धा व यशोदा नदीच्या पंचधारा संगमावर देवतांना स्नान घालून आदिवासी बांधवांनी या देवदेवतांची पूजा केली. अनेक जण मोटारीने, वाहनाने तर अनेकजण अनेक किलोमीटर पायी या ठिकाणी चालत आले. विविध वाद्याच्या निनादात, नृत्य करीत आपापल्या पारंपारिक पोशाखात त्यांनी हजेरी लावली. व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.
उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी मागील आठवड्यात या यात्रे संदर्भात बैठक घेऊन प्रशासनास जय्यत तयारीचे निर्देश दिले होते. त्यानुसार यावेळी प्रथमच प्रशासनाने भाविकांसाठी संपूर्ण सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. आरोग्य पथक, ॲम्बुलन्स, पोलिस यंत्रणा, दंगा नियंत्रण पथक, अग्निशमन वाहन, पाण्याचे टँकर, पार्किंग व्यवस्था, मोबाईल टॉयलेट व्हॅन, चेंजिंग पेंडॉल आदी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत्या. त्यामुळे भाविकांना सुविधा झाली.
उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार अमित भोईटे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची व सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. महसूल, विज विभाग, वन विभाग, वैद्यकीय सेवा, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.
स्नान बंदोबस्त करिता सात अधिकारी 53 पोलिस अंमलदार, एक जलद क्रुती दल पथक,एक रेसक्यु पथक नियुक्त होते. ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. यात्रा शांततेत संपन्न झाली.