

शस्त्रधारी दरोडेखोरांकडून महिलांना अमानुष मारहाण
यवतमाळ जिल्ह्यातील चिल्ली (इजरा) या गावापासून किमान तीन किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम गोकुळवाडी येथे शेतात वास्तव्यास असलेल्या संतोष कुमार मनोहर पांडे यांच्या घरावर काल शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ६ अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. घरातील महिलांवर शस्त्रांचे वार करीत दरोडेखोरांनी घरातील किमान ३० लाख रुपये रोख आणि १७ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. आज दुपारी उशिरा ही घटना पंचक्रोशीत माहीत झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. पांडे कुटुंब हे चिल्ली येथील जुने इजारदार आहेत. पांडे कुटुंबाकडे चिल्ली (इजारा) परिसरात किमान पाचशे एकर शेत जमीन होती. चिल्ली (इजारा) गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील दुर्गम भागात गोकुळवाडी येथे संतोष कुमार मनोहर पांडे हे शेतात जुन्या वाड्यासारखे घर बांधून वास्तव्यास आहेत. संतोष कुमार पांडे यांच्या सोबत त्यांची बहीण कु. कृष्णा मनोहर पांडे (३५) आणि सौ.सविता सुभाष तिवारी (४९) रा. नागपूर, ह्या काल रात्री घरात मुक्कामी होत्या. काल मध्यरात्री ११.३० वाजताच्या सुमारास ६ अज्ञात लुटारुंनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला. शस्त्राच्या धाकावर या लुटारूंनी घरातील रोख रक्कम व मुद्देमाल ताब्यात घेतला. यावेळी महिलांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी महिलांना लाकडी राफ्टर व शस्त्राचे वार करून मारहाण केली. या मारहाणीत सौ.सविता सुभाष तिवारी यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून कु. कृष्णा पांडे ह्या सुद्धा जखमी झाल्या आहेत. दरोडेखोरांनी घराची झाडाझडती घेत ३० लाखावर रोख रक्कम आणि १७० ग्राम सोन्यांचे दागिने असा ३८ लाख ५० हजाराचा ऐवज लुटून नेला.
दरोड्याच्या घटनेची १२ तासानंतर पोलिसांना खबर
चिल्ली (इजारा) गावापासून तीन किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेतात रात्री साडेअकरा वाजता दरोडेखोरांनी संतोष कुमार पांडे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकला. या गंभीर गुन्ह्याची खबर महागाव पोलिसांना तब्बल १२ तासानंतर, म्हणजे आज रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास लागली. संतोष कुमार पांडे यांनी ११२ नंबर डायल करून घटनेची सूचना पोलिसांना दिली. हा फोन बिटरगाव पोलिसांनी रिसीव्ह केला. घटनास्थळ महागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने त्यांनी ही घटना महागाव पोलिसांना कळविली, परंतु गोकुळवाडी हे गाव नेमके कोठे आहे याचा थांगपत्ता महागाव पोलिसांना लागत नव्हता. दरोडा पडल्याचे ठिकाण शोधायला पोलिसांना १२ तास लागले.
गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा पोलिसांचा आटापिटा
चिल्ली इजारा येथील पांडे घराण्यातील संतोष कुमार पांडे यांच्याकडे किमान दीडशे एकर शेत जमीन असल्याचे कळते. त्यांनी मागील महिनाभरात आपला शेकडो क्विंटल कापूस फुलसावंगी बाजारपेठेत विकला. रात्री दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर संतोष कुमार पांडे यांच्या घरातून किमान ८५ लाखाची रोख रक्कम व ४० तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची पंचक्रोशीत चर्चा आहे, परंतु गुन्हयाचे गांभीर्य कमी करण्यासाठी पोलिसांनी ३० लाख रुपये रक्कम व १७० ग्राम सोने, एवढाच मुद्देमाल तक्रारीत नोंदवून घेतला व गुन्हा बर्किंग केला अशी चर्चा होत आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक, एसडीपीओ, ठसे तज्ञ व श्वान पथक घटनास्थळी
सशस्त्र दरोड्याच्या घटनेत महिलांना गंभीर मारहाण करून जवळपास ४० लाखाचा मुद्देमाल लुटून नेल्याच्या खळबळजनक घटनेनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, ठाणेदार सोमनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजभारे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी ठसे तज्ञ (फिंगर प्रिंट एक्सपर्ट) आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दरोडेखोरांनी पाणी पिऊन पाण्याच्या बॉटल फेकून दिल्या. त्यावर त्यांच्या बोटाचे ठसे उमटले असून, त्या आधारे दरोडेखोरांपर्यंत पोहोचता येईल असा विश्वास अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांनी व्यक्त केला. महागाव पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर, मार्गदर्शक संजय भगत, गजानन वाघमारे, अमोल राजवाडे, नंदकुमार कवळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांची भेट घेऊन माहिती विचारली असता त्यांनी या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली व लवकरच गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला.
दरोडेखोर महागाव तालुक्यातील असल्याची शक्यता
संतोष कुमार पांडे हे ज्या गोकुळवाडी येथे राहतात ते ठिकाण अत्यंत दुर्गम आहे. चिल्ली (इजारा) येथून जंगल भागात तीन किलोमीटर अंतरावर शेतात त्यांचा जुना वाडा आहे. येथे वीज आणि मोबाईल नेटवर्कही नाही. या शिवाय गोकुळवाडी म्हणून संबोधल्या जाणारे ठिकाण पोलिसांच्या दप्तरी नोंदलेले नाही. या दुर्गम व निर्जन ठिकाणी दरोडेखोरांनी पाळत ठेवून दरोडा टाकला. त्यामुळे नेहमीच्या परिचयातील हे गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांना आहे. फुलसावंगी, महागाव किंवा काळी (दौलत) येथील संशयीतांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. गुन्ह्याची मोड्स ऑपरेंडी व मोबाईल टावर लोकेशन ट्रेस करून गुन्ह्याची दिशा ठरवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे
गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पाच पथक
दरोड्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी पोलिसांचे वेगवेगळे पाच पथक गठीत केले आहेत. सायबर सेलची मदत घेऊन गुन्हा डिटेक्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठसे तज्ञ आणि श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे.गुन्हेगारांची मोड्स ऑपरेंडी आणि गुन्ह्याची पद्धत पाहता आरोपी शोधून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक व यंत्रणा खास मेहनत घेत आहे. दरम्यान दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथे रेफर करण्यात आल्याचे कळते.
मराठी व हिंदीतून संभाषण करीत होते दरोडेखोर
दरोडेखोरांची संख्या सहा होती यातील केवळ एकाने आपला चेहरा रुमालाने झाकला होता. दरोडेखोर आपापसात हिंदी व मराठी भाषेत संवाद साधत होते. महिलांनी प्रतिकार करताच अश्लील शिवीगाळ करीत दरोडेखोरांनी त्यांच्यावर शस्त्राने व लाकडी दांडक्याने हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाल्या. सर्व दरोडेखोरांची अंगकाठी मजबूत होती व शरीरयष्टी उंच होती अशी माहिती संतोष कुमार पांडे यांनी पोलिसांनी दिली.
महागाव पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून दरोडेखोरांना अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणा जीवाचे रान करीत आहे.
