पुन्हा पक्षबांधणी करून विधानसभेत यश मिळवू
–अॅड. प्रफुल्ल चौहान

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये राळेगांव विधानसभा क्षेत्रात २४,६०० मतांची पिछाडी महायुतीच्या उमेदवाराला मिळाली, त्यावरून अनेक विरोधकांनी असे कयास बांधले आहेत की, आता विधानसभेला भाजपाचे कमळ राळेगांव मतदारसंघात फुलणार नाही. परंतू आता नव्याने पुर्ण विधानसभा क्षेत्रात पक्ष बांधणी करून त्याला मजबुती देवून, होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलवू असा विश्वास भाजपाचे नेते व जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रफुल्लसिंह चौहान यांनी व्यक्त केला. हे खरे आहे की, मागील ५ वर्षात झालेल्या बहूतांश निवडणुकी मध्ये भाजपा ला पाहीजे तसे यश मिळाले नाही, किंबहूना पराभवच पहायला मिळाला. नगरपंचायतीच्या निवडणुकी मध्ये यापुर्वी कळंब, राळेगांव आणि बाभुळगांव या तीनही ठिकाणी भाजपाची सत्ता होती, परंतु त्यानंतर झालेल्या निवडणुकी मध्ये तीनही नगरपंचायत क्षेत्रात भाजपा चा दारूण पराभव झाला. राळेगांव नगरपंचायती मध्ये तर १७ पैकी ११ ठिकाणी ११ हि उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले व एकही उमेदवार निवडून आला नाही. येवढेच नव्हेतर, त्यानंतर झालेल्या निवडणुकी मध्ये मग ती सोसायटीची निवडणुक असो, खरेदी-विक्री संघाची निवडणुक असो वा कृषिउत्पन्न बाजार समितीची निवडणुक असो प्रत्येक निवडणुकी मध्ये भाजपाच्या उमेदवाराचा दारूण पराभवच झाला याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली असुन पुन्हा नव्याने पक्ष बांधणी करण्याची गरज दिसुन येत आहे. लोकसभा निवडणुकी मध्ये महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड पिछाडी राळेगांव मतदार संघाात मिळाली. २४,६०० हा आकडा कमी नाही परंतु आता भाजपाचे मतदार, हितचिंतक व कार्यकत्र्यांचे मनोवल खच्ची करण्याचे काम विरोधकां कडून सुरू असुन आता होवू घातलेल्या विधानसभेत भाजपाच्या उमेदवाराचे बेहाल होतील असे चित्र उभे करण्याचे षडयंत्र सुरू आहे. परंतु भाजपाचे हितचिंतक, मतदार आणि कार्यकर्त्यांचे अजूनही मनोबल शाबुत असुन त्याला फक्त नव्याने उभारी देण्याची गरज आहे. पक्षसंघटना बांधुन नव्या जोमाने कामाला लावण्याची आवश्यकता आहे व त्यासाठी लवकरच भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांना भेटून पुन्हा नव्याने पक्ष बांधणी करून विधानसभेत राळेगांव विधानसभा क्षेत्रात भाजपाचे कमळ फुलवण्याचा विश्वास भाजपाचे नेते अॅड. प्रफुल्ल चौहान व्यक्त केला आहे