
ढाणकी प्रतिनिधी – ढाणकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली धुणे धुण्यासाठी गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन त्या पाण्यात बुडाल्या आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांना वाचवण्यासाठी जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली मात्र त्या दोन मुलींना त्यांना वाचवण्यात यश आले नाही . ही घटना आज दिनांक 26 जून रोजी 12 वाजता घडली. त्या दोघांपैकी एक मुलगा पाण्यात बुडाला.
सविस्तर वृत्त असे की, सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेल्या कावेरी गौतम मुनेश्वर वय पंधरा वर्ष ही मुलगी आपली मैत्रीण अवंतिका राहुल पाटील वय 14 वर्ष तिच्यासोबत धुणे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. धुणे धुतल्या नंतर दोघी आंघोळी करता नदीपात्रात उतरल्या असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून बाजूलाच नदीकाठी असलेले चेतन देवानंद काळबांडे राहणार सावळेश्वर वय सोळा वर्ष, व शुभम सिद्धार्थ काळबांडे वय 22 वर्ष हे दोघे मदतीसाठी धावले. मात्र घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतन याला घट्ट पकडल्याने चेतन सुद्धा पाण्यात बुडू लागला तर शुभम यामधून वाचला. घटनेची माहिती गावामध्ये कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. यात गावकऱ्यांनी शुभम याला वाचवले मात्र त्या तिघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले नाही. चौघांना नदीतून बाहेर काढल्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे आणले असता डॉक्टरांनी कावेरी, अवंतिका आणि चेतन यास मृत घोषित केले. या घटनेमुळे सावळेश्वर गावामध्ये शोककळा पसरली आहे.
चेतन देवानंद काळबांडे यांच्या वडिलांचा सुद्धा काही दिवसापूर्वी साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेव्हापासून चेतनची आई कविता ही चेतन सोबत राहत होती. आज चेतनच्या अशा अचानक मृत्यूने कविताबाई ही एकाकी पडली असून शासनाने तिला योग्य ती मदत करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.
