.

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील आष्टा येथील अवैध दारू अखेर महिलांनीच पकडली.काही दिवसाआधी राळेगाव पोलीस स्टेशन वर धडक देऊन अवैध दारू विक्री बंद करा या मागणीसह महिलांनी धडक दिली होती, मात्र नेहमीच्या सवयी प्रमाणे राळेगाव पोलिसांनी दुर्लक्ष केले अखेर महिलांनीच पुढकरा घेऊन दारू पकडली. विशेष म्हणजे ही दारू विक्री स्मशानातं सुरु होती. व्यसनाधिनतेमुळे स्मशानात जायची वेळ आली असतांना थेट स्मशानातच दारू विक्रेत्याने दुकान थाटले होते.
अवैध दारू पकडल्या नंतर गावातील महिलांनी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांना सर्वप्रथम माहिती दिली. सोबतच भाऊ तुम्ही स्वतः या अशी विनंती देखील केली. दरम्यान महिलांनी राळेगाव पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली. त्या नंतर पोलीस गावात दाखल झाले. शशिकांत धुमाळ यांनी या ठिकाणी महिलांसह जात दारू पकडण्यात पुढाकार घेतला. विशेष म्हणजे अनेकांना येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी मदत मागण्यात आली होती पण कुणीही पुढाकार घेतला नाही.
राळेगाव पोलिसांनी सचिन कांबळे याचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 / फ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील कारवाई राळेगाव पोलीस करत आहे. गावात पुन्हा अवैध दारूविक्री सुरु झाल्यास राळेगाव पोलीस स्टेशन समोर गावातील महिला आमरण उपोषण करतील अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे.
ग्रामसेवकाप्रती प्रचंड संताप
आष्टा येथील अवैध दारू विक्री ही स्मशान भूमी परिसरात सुरु होती. या ठिकाणी शेड मध्ये बाकायदा(?)अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी खर्रा, चकना चे दुकान थाटले. अंत्यविधी मध्ये वापरलेले मुरमुरे वा तत्सम पदार्थ देखील इथे दारू पिणाऱ्यांना विकले जात असल्याची माहिती आहे. या बाबत ग्रा. प. सरपंच यांना वारंवार येथील महिलांनी माहिती दिली. हा परिसर ग्रा. प. च्या अख्त्यारीत येतो. मात्र ग्रा
प. सचिवाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. या कडे सोईस्कर दुर्लक्ष करणाऱ्या सचिवा बाबत महिलांनी संताप व्यक्त केला.
