
उमरखेड/प्रतिनिधि :
पंचायत समिती उमरखेड च्या अनागोंदी कारभाराविरोधात काल पुरोगामी युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती उमरखेड वर जवाब दो आंदोलन करीत गट विकास अधिकारी यांना जाब विचारला.
उमरखेड तालुक्यात मागील काही वर्षांपासून शासकिय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहे. शासकिय योजनेत लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैश्यांची मागणी केली जाते. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव पंचायत समितीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना आपला धनादेश काढण्यासाठी पैसे द्यावे लागत आहेत. यात अनेकांचा हिस्सा असतो. पंचायत समितीचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांची ही जबाबदारी असते की त्यांनी आपल्या तालुक्यात होणाऱ्या गैरव्यवहारावर अंकुश लावावा. परंतु याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे कारवाईबाबत उदासीन दिसतात. पुरोगामी युवा ब्रिगेड ने सुद्धा अनेक वेळेस निवेदन देऊन सुद्धा गटविकास अधिकारी यांनी कुठलीच ठोस भूमिका न घेतल्यामुळे पुरोगामी च्या कार्यकर्त्यांनी थेट पंचायत समिती गाठत जवाब दो आंदोलन करीत गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखडे यांना धारेवर धरले. आंदोलकांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या केल्या असून यामध्ये सर्व शासकीय योजना पारदर्शकपणे राबवा, पंचायत समितीत दलालांचा हस्तक्षेप थांबवा, रोजगार हमी योजना फक्तं कागदावरच न राबविता प्रत्यक्षात पारदर्शकपणे राबवा
, पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुज्जोरी व जनतेला देण्यात येणारी वाईट वागणूक थांबवावी , पंचायत समितीत बाहेर गावावरून ये-जा करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे शासकीय निवासस्थानी राहणे बंधनकारक करावे , पंचायत समिती अंतर्गत होणारे सर्व बांधकाम हे इस्टीमेट नुसार करावे, शेतकऱ्यांकडून विहीरी, गोठ्या करिता कर्मचाऱ्यांनी एक रुपया सुध्दा मागू नये, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांकडून आर्थिक मागणी थांबवावी आदि मागण्या निवेदनात करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील बंदिभागातील युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यामध्ये शाहरुख पठाण, परमेश्वर रावते पाटिल, भागवत सूर्यवंशी, अनिल हरणे, आतिश वटाणे, मनोज धुळध्वज, अंबादास गव्हाळे , नागराज दिवेकर, मुक्तार शाह, आश्विन राठोड, ताहेर शाह, गजानन गायकवाड, आकाश लोमटे, अंकुश हणवते, श्रीनिवास नरवाडे, दत्ता वऱ्हाडे, ओमकार सुकळकर, माजीद पठाण, शंकर गुंडेकर, विक्रम जाधव, शेख आमिन, आदि उपस्थित होते.
” पंचायत समिति ही लोकांच्या सेवेसाठी आहे. उत्पन्नाचे स्त्रोत नाहि. शासकीय योजनेतील दलाल आधीं हटवा.
ही तर फक्तं सुरूवात आहे. आम्ही इथेच थांबणार नाही. आठ दिवसांत पंचायत समितीने आमच्या मागण्या पुर्ण न केल्यास पंचायत समिती समोर आमरण उपोषण केलें जाईल. याबाबत लवकरच ग्रामविकास मंत्री व प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांची भेट घेणार “
शाहरुख पठाण
प्रवक्ता, पुरोगामी युवा ब्रिगेड
आंदोलक येताच पंचायत समितीच्या गेट ला लावले कुलुप….
आंदोलक युवकांची संख्या व आक्रमकता लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून पंचायत समितीच्या गेट वर कुलुप लावून फौज फाटा वाढविण्यात आला होता. गेट ला कुलुप लावून बंद केल्यामुळे काही काळ आंदोलन अधिकच चिघळले होते. युवकांनी यावर आक्षेप घेत विरोधात घोषणाबाजी केली. नंतर गट विकास अधिकारी स्वतः बाहेर येऊ आंदोलकांशी चर्चा केली
