
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात काल दि ३१ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाला.राळेगावत मंडळात ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील सावंगी पेरका, वाटखेड या गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे वाटखेड गावालगत असलेल्या नाल्याला प्रचंड प्रमाणात पूर येऊन अनेकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.त्यामुळे घरातील संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे भिजलं आहे. तर अन्नधान्य सुद्धा या पाण्यात भिजल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. परिसरागत शेती पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, काही शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.पुराचे पाणी शेतात शिरले आहे.शेकडो एकर शेती या पाण्यामुळे खरडून गेली आहे. सोयाबीन,तूर कापूस पिकांना याचा फटका बसला आहे.पिकांच्या मुळ्या उघड्या पडल्याने आता ही सर्व पिके नष्ट होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तहसीलदार अमित भोईटे, कृषी अधिकारी जोशी मंडळ अधिकारी महादेव सानप यांनी तालुक्यातील वाटखेड,सावंगी पेरका या गावाला भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली असून तहसीलदार भोईटे यांनी संबंधित तलाठ्यांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
