
बंदीभागातील चिखली, कोरटा , कुरळी व दराटी गावातील शेकडो घरे पाण्याखाली =
आमदार नामदेव ससाने कडून पाहणी दरम्यान तात्काळ सर्वे करण्याचे निर्देश
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
तालुक्यात सर्वदुर रात्रभरापासून ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले . या पावसात तालुक्यातील बंदीभागातील चिखली, कोरटा , कुरळी घमापुर व दराटी या गावातील नाल्याकाठावरील शेकडो घरात पाणी घुसल्याने अनेक घराच्या पडझडीसह घरातील अन्न धान्या सहित भांडे वाहून गेले तर या नाल्याच्या पुरात एक म्हैस व एक ट्रॅक्टर वाहून गेले आहे . एवढेच नव्हे तर सततधार पावसामुळे बंदीभागातील अनेक गावातील हजारों हेक्टर शेतामधील कापूस, तूर व सोयाबीन पिके उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे .
दरम्यान आज आमदार नामदेव ससाने यांनी बंदीभागातील या आपादग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ सर्वे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे .
काल दिनांक ३१ ऑगष्टच्या रात्री ८ वाजेपासून तालूक्यात सर्वदुर पावसाला सुरुवात झाली . पाऊस रात्री २ वाजतानंतर चिखली, कोरटा व दराटी गावच्या नाल्या जवळील घरामध्ये शिरण्यास सुरुवात झाली . चिखली येथील ५० ते ६० घरे, कोरटा येथील १५० ते २०० घरे तर दराटी येथील ३० ते ४० घरे पाण्याखाली आल्याने घरातील अन्न धान्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून काही नागरिकांनी गावातील मंदीराकडे धाव घेतली तर अनेकांनी बाजा घराला टांगून कशीबशी रात्र जागून काढली सध्या पाऊस ओसरण्यास सुरुवात झाली आहे . या नाल्याच्या पुरामध्ये गजानन बरणे यांची म्हैस तर अलंकार भगत यांचे ट्रॅक्टर नाल्याच्या पुरात वाहून गेले आहे .
चिखली , कोरटा, दराटी या गावाच्या घराच्या पडझडीसह कुरळी घमापुर, डोंगरगाव, बोरगाव, भवानी, मोरचंडी , एकांबा , जवराळा , जांब गावासहित बंदिभागातील अनेक गावातील नाल्याकाठावरील हजारों हेक्टर शेतजमीनीतील तुर , कापुस , सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल या गावचे तलाठी गजानन कवाणे यांनी प्रशासनाला सांगीतला आहे .
मी काय खावु साहेब ! आजी – आजोबानी फोडला टाहो !

कोरटा येथिल नाल्याकाठावर राहणारे ७५ वर्षीय आजी – आजोबा चिंतामण व गुनाबाई यांनी आमदार नामदेव ससाने यांना पाहताच टाहो फोडला . घरात असलेली सात आठ क्विंटल ज्वारी व इतर धान्य वाहून गेले . कसाबसा जीव वाचला साहेब रात्रभरापासून उपाशी आहो म्हणताच आमदारांनी तात्काळ निराधार आजी- आजोबांना किराणा सामानाची अन्न धान्याची व आरोग्य तपासणी करण्यासाठी आर्थिक मदत यावेळी करून त्या कुटुंबियाला दिलासा दिला आहे .
रात्रभरापासून तालूक्यात पाऊस कोसळत आहे . चिखली, दराटी व कोरटा या तिनही गावातील अंदाजे ३०० घरे पाण्याखाली आल्याने तिथे राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहे त्यामुळे तात्काळ या गावातील घरांचा सर्वे तसेच बंदिभागातीलअनेक गावातील हजारो हेक्टर शेतीतील पिके उद्धवस्त झाली असून उघाड होताच सर्वे करून तात्काळ प्रशासन व शासनाकडून मदतीसाठी प्रयत्न करणार आहोत . नाल्याकाठावरील घरातील नागरिकांनी पाऊस वाढला तर ताबडतोब घर खाली करून काळजी घ्यावी .
नामदेव ससाने
आमदार , उमरखेड – महागाव
