
सहसंपादक : रामभाऊ भोयर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दि २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय आमदार केसरी शंकरपट तालुक्यातील वडकी येथील सोमेश्वर महाजन यांच्या शेतात नुकताच पार पडला. यात बैलजोडी धारकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने नागरिकांना परिसरातील शंकरपटाचा थरार अनुभवायला मिळाला. तीन दिवसीय शंकरपटात दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. विविध रंगी चपळ आणि देखण्या जोड्या ११५ मीटरचे अंतर मोठ्या तीव्रतेने पार करताना प्रेक्षकांच्या मनाचा ठेका घेत होते. सुसाट वाऱ्याच्या वेगाने डोळ्याची पापणी न हालता अंतर पार करीत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पाळणे फिटत होते. तीन दिवस चाललेल्या जंगी आमदार केसरी शंकरपटाचे समारोप विजेते स्पर्धक, बैलजोडी मालक शेतकऱ्यांचा सत्कार आदिवासी विकास मंत्री प्रा,डॉ अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये वाढोणा येथील ‘लकी सुंदर’ आणि वीरखेडच्या शुकऱ्या विक्रम जोडीने बाजी मारत वडकीचा शंकरपट गाजवला
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे. शेतकऱ्यांचा सन्मान ही माजी व सर्वांची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांचा आदर झाला पाहिजे अशा भावना मंत्री प्रा. डॉ अशोक उईके यांनी बक्षीस वितरणाप्रसंगी व्यक्त केल्या.
या सोहळ्याला भाजपा तालुकाध्यक्ष चितरंजन कोल्हे, माजी सभापती प्रशांत तायडे,शहराध्यक्ष कुणाल भोयर,माजी आमदार राजूभाऊ तिमांडे,तहसीलदार अमित भोईटे,सामाजिक कार्यकर्ता संजय काकडे,विशाल पंढरपुरे,ठाणेदार सुखदेव भोरकडे,बबन भोंगारे,सुनील चोपडा,रुपेश बोरकुटे यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.
या उदघाटन प्रसंगी मंत्री प्रा डॉ अशोक उईके यांनी घडी चालक केशव भोसारकर,प्रशांत इंगोले व लिटिल माष्टर प्रणव गावंडे यांचा सत्कार केला.
हा आमदार केसरी शंकरपट यशस्वी करण्याकरिता भारतीय जनता पार्टी वडकी सर्कलचे माजी सरपंच दिलीप कडू,अनिल नंदुरकर,सचिन डोरलीकर, रविंद्र चौधरी,किशोर फुटाणे,वैभव कडू, शारदानंद जयस्वाल रंजित ठाकरे,निखिल शेळके व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता.
..………………………………………
या शेतकऱ्यांच्या बैलजोडीने पटकाविले बक्षीस
या शंकर पटात वाढोना ता धामणगाव येथील गणेश कावलकर यांच्या लकी-सुंदर या जोडीने ७.७४ सेकंदात स्पर्धा पूर्ण करीत (अ) गटातून प्रथम क्रमांक पटकाविला, घारफळ ता,बाभूळगाव येथील बाबाराव भोंग यांच्या बन्सी-तेजा जोडीने ७.९२ सेकंद घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला तर दगडधर ता,महागाव येथील शिवाजी राठोड यांच्या रुबाब-आयकॉनिक जोडीने ७.९६ सेकंद घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.
तर (ब) गटातून विरखेड बाभुळगाव येथील लक्ष्मी पांडे यांच्या शुकऱ्या-विक्रम जोडीने ८.०८ सेकंदात स्पर्धा पूर्ण करीत प्रथम क्रमांक पटकाविला.राजूर कॉलनी वणी येथील भाविका मिलमिले यांच्या सम्राट-पिस्टन जोडीने ८.११ सेकंद घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला.तर खंडाळा आर्णी येथील सेवाजी राठोड यांच्या पुष्पाराज-टाईगर जोडीने ८.२१ सेकंद घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.
यासोबतच (अ) गटात ८ बक्षिसे तर ब गटात ९ बक्षिसे देण्यात आली.या आमदार केसरी शंकर पटात विदर्भातील विविध भागातून बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या.
