
सहसंपादक :;रामभाऊ भोयर
राळेगाव पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करून चार वेगवेगळ्या दुकानांमधील चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. सतिष उर्फ शेवळ्या बाबाराव मडावी (वय २५ वर्ष, रा. दादाबादशहा वार्ड, राळेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेले ८ हजार रुपये किमतीचे दोन कॅमेरे आणि ४ हजार ७०० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
फिर्यादी राजू चंद्रभानजी पुडके (वय ५५ वर्ष, रा. शिवाजी नगर राळेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ मार्च २०२५ रोजी रात्री १२:०० ते २६ मार्च २०२५ रोजी सकाळी ०७:०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या साहील डेलिनिङ्स या दुकानाचे टिनपत्र काढून दुकानात प्रवेश केला. चोरट्याने दुकानातील ३ हजार रुपये किमतीचा कॅमेरा आणि गल्ल्यातील २२ हजार रुपये चोरून नेले. याच पद्धतीने चोरट्याने चेतन किशोर कापसे यांच्या
दुकानाचे टिनपत्र काढून ५ हजार रुपये किमतीचा कॅमेरा आणि ६ हजार रुपये रोख, अविनाश जिवनराव मडावी यांच्या पानठेल्यातून ३ हजार रुपये आणि नितीन शालीकराव ठुने यांच्या दुकानातून टिनपत्र काढून २ हजार रुपये रोख तसेच ८ हजार रुपये किमतीचा एक अगरबत्तीचा बॉक्स असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ०१४५/२०२५ कलम ३०५ (ए), ३३४ (१) भा.न्या.सं. २०२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये चोरी करणारा इसम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सतिष उर्फ शेंबड्या बाबाराव मडावी याच्यासारखा दिसत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी सतिष मातानगर परिसरात संशयास्पद फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाठलाग करून सतिषला ताब्यात घेतले.
