
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने निर्णय न झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात “सातबारा कोरा करा” या मागणीसाठी आज महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राळेगाव तालुक्यातही वसंत जिनिंग जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३३ वर सर्वपक्षीय नेतृत्वाखाली शांततेत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि इतर पक्षांचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “सातबारा कोरा करा”, “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “जय जवान जय किसान” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.या आंदोलनामागील पार्श्वभूमी अशी की, गुरुकुंज मोझरी येथे बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन करत मुख्यमंत्र्यांकडून समिती गठित करून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन घेतले होते. मात्र आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावाहून ते साहेबराव करपे यांच्या चिलगव्हाण गावापर्यंत १४५ किमीची “सातबारा कोरा” पदयात्रा काढली होती.
राळेगावमधील आंदोलनात सहभागी नेत्यांमध्ये संजय दुरबुडे, दिलीप कन्नाके, विनोद काकडे, राहुल बहाळे, मधुकर राजूरकर, सय्यद लियाकत अली, शाम धुर्वे, प्रमोद ढाले, नितीन कोमेरवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता. राळेगाव पोलिसांनीही शांततापूर्ण आंदोलनात सहकार्य केले.या आंदोलनाच्या माध्यमातून फक्त शेतकरीच नव्हे तर धनगर, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांग, कष्टकरी मजूर या सर्व वंचित घटकांच्या मागण्यांनाही न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
