
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वर्धा नदीकाठावरील कळमनेर गाव — जिथून राळेगाव शहरालाही पाणीपुरवठा होतो, तिथेच गावातील महिलांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी चिखल तुडवत जीव धोक्यात घालावा लागत आहे. भर पावसाळ्यात पाण्यासाठीचा हा संघर्ष गावकऱ्यांच्या अस्वस्थतेचे कारण ठरत आहे.कळमनेर हे गाव गट ग्रामपंचायती अंतर्गत असूनही, पिण्याच्या पाण्याची सोय अत्यंत अपुरी आहे. गेल्या ५०-६० वर्षांपासून संपूर्ण गाव एका हँडपंपवर अवलंबून आहे, तोही गावाच्या बाहेर. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था इतकी बिकट होते की, त्या मार्गाने चालणे म्हणजे थेट धाडसच!
गेल्या महिन्यात लावण्यात आलेला सोलार पंपदेखील अकार्यक्षम ठरला आहे. नळधार पातळ, टाकीला झाकण नाही आणि साचलेले पाणी अस्वच्छ आहे. त्यामुळे नागरिकांची अपेक्षा होती की ग्रामपंचायत काही तरी उपाय करेल, पण आजतागायत त्या चिखलमय रस्त्यावर मुरूमसुद्धा टाकण्यात आलेला नाही.या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून, “वर्धा नदीकाठचं गाव, पण पाण्याच्या एक थेंबासाठी लढा!” अशी कटू टिप्पणी ते करत आहेत. संबंधित वरिष्ठ प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व ग्रामपंचायतीवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आता गावकऱ्यांकडून केली जात आहे.
