

महागाव तालुक्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच फुलसावंगी गावात चोरी, जुगार, मटका, अवैध दारू विक्री आणि गांजा यांसारखे गैरव्यवसाय खुलेआम सुरू आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना ठाणेदारा मार्फत एक निवेदन दिले असून, तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. फुलसावंगी मध्ये मागील काही दिवसांपासून लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांची भूमिका या सर्व प्रकरणांमध्ये संशयास्पद असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
जुगार, मटका आणि अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच, गांजासारख्या मादक पदार्थांची तस्करीही होत आहे. यामुळे तरुणाई चुकीच्या मार्गाकडे वळत असून, सामाजिक शांतता धोक्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
याशिवाय, काही व्यक्ती जमाव जमवून गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने योग्य ती कारवाई करावी सरपंच सारजाबाई वाघमारे, उपसरपंच कुणाल नाईक, अध्यक्ष विविध कार्यकारी सोसायटी स्वप्निल नाईक, अध्यक्ष व्यापारी संघटना रविंद्र पांडे, पोलिस पाटील राजेश नाईक, अध्यक्ष तंटामुक्त समिती योगेश वाजपेयी, मा. सरपंच दिनेश नाईक, विनोद सोरते, अमर दळवे, सचिन कोकणे, कुलदिप वैद्य, दिपक लांडगे, शैलेश पेंटेवाड, अनंता वैद्य व मोठ्या संख्येने नागरिकांनी
अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नागरिकांची मागणी
गावातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे थांबवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालावे, अशी विनंती फुलसावंगीच्या नागरिकांनी केली आहे. पोलिसांनी गावात गस्त वाढवावी, सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी आणि अवैध धंदे बंद करावेत, जेणेकरून गावातील शांतता आणि सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित होईल.
