
सहसंपादक : रामभाऊ भोयर
निर्मल इंडियन शोषित हमारा आमदल निषाद पार्टी वर्धा, महाराष्ट्र तर्फे दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी रविवारी देवळी येथील श्री. चंद्रकौशल्य तडस सभागृहात भव्य जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री व निषाद (भोई) पार्टीचे सुप्रीमो डॉ. संजयकुमार निषाद यांचे आगमन झाले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उत्तर प्रदेशच्या माजी खासदार प्रवीण निषाद, राष्ट्रीय सचिव संजय शुक्ला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास केवदे, वर्धा जिल्हाध्यक्ष व संपर्क प्रमुख सुनील ढाले, प्रदेश संघटक अध्यक्ष सुभाष दाते, जिल्हा प्रभारी रवींद्र भानारकर, तसेच भोई गौरव मासिकाचे संपादक चंद्रकांत लोणारे, सह-संपादक प्रकाश लोणारे, विदर्भ अध्यक्ष राहुल गौर आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लक्षणीय होती. महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या मेळाव्याचे आयोजन महर्षी वाल्मिकी समाज संस्था, देवळी यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संजयकुमार निषाद म्हणाले :
“आगामी काळात निषाद पार्टी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आपली शाखा स्थापन करेल. समाज मागास राहण्यामागील कारणे दूर करण्यासाठी आपण झेंडा, नेता, नारा व संघटन या शक्तींनी सज्ज राहिले पाहिजे. जिस समाज का दल होता है, उसका बल होता है.”
मेळाव्यात विदर्भातील सर्व सामाजिक संघटना प्रथमच एका व्यासपीठावर आल्या. समाजातील एकी, जातीय बंधनातून मुक्तता आणि विकासासाठी ठोस उपाय यावर चर्चा झाली.
कार्यक्रमात भोई गौरव मासिकाचा नवरात्र विशेषांक डॉ. संजय निषाद यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गौर यांनी केले. प्रस्तावना सुनील ढाले यांनी सादर केली तर आभार प्रदर्शन रवींद्र भानारकर यांनी केले.
