
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील सरपंच सौ. अर्चना राजेंद्र एकुणकर यांनी पत्रकार प्रकाश माधवराव खुडसंगे (तालुका प्रतिनिधी – दैनिक युवाराष्ट्र दर्शन) यांना तब्बल १५ लाख ५० हजार रुपयांची मानहानी नोटीस दिल्यानंतर पत्रकार समाजात संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायकारक नोटीसीविरोधात राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी, राळेगाव यांना निवेदन देऊन जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला.
दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथील वकील अॅड. निशांत जे. पाटील यांच्या मार्फत सरपंचांनी बजावलेली नोटीस ही पत्रकारांना गप्प करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. पत्रकार खुडसंगे यांनी प्रसिद्ध केलेली बातमी ही शेतकरी दिवाकर नानाजी वनारसे यांनी स्वतःच्या स्वाक्षरीसह दिलेल्या प्रेस नोटीवर आधारित असल्याने ती बातमी सत्य व दस्तऐवजीकृत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
सरपंचांनी ग्रामपंचायतीतील आरोपांना उत्तर देण्याऐवजी पत्रकारांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला असून हा प्रकार लोकशाहीतील चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
बॉक्स…!👇👇
“पत्रकार हे समाजाचे डोळे व कान आहेत. अन्याय उघड करणाऱ्या पत्रकारांवर खोट्या नोटीसा देणे हा लोकशाहीला काळा डाग आहे. प्रकाश खुडसंगे यांच्यावरची मानहानी नोटीस ही पूर्णपणे अन्यायकारक असून ती तात्काळ मागे घेण्यात यावी. प्रशासनाने दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.
राजु रोहनकर
अध्यक्ष
तालुका पत्रकार संघटना राळेगाव
संघटनेच्या ठाम मागण्या
१) उमरी सरपंच सौ. अर्चना एकुणकर यांनी दिलेली मानहानी नोटीस त्वरित मागे घ्यावी.
२) ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
३) पत्रकारांना न्याय व संरक्षण देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.
४) पत्रकारांवर खोटे खटले व नोटीसा देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे धोरण तयार करावे.
पत्रकार हे समाजाचे डोळे व कान असून, त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण करणे हा लोकशाहीला घातक प्रकार असल्याचे संघटनेने नमूद केले.
यावेळी निवेदन देताना राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजु रोहनकर व सर्व पत्रकार संघटनेचे प्रतिनिधी बाळु धुमाळ, खुशाल वानखेडे, मिलिंद धनवीज, विशाल मासुरकर, विवेक कुमरे, कैलास कोडापे, अरविंद कोडापे, शशीम कांबळे, मंगेश मोहुर्ले, जितेंद्र खोडे, अमोल गाऊत्रे, नितीन हिकरे, रजत चांदेकर, नरेश राऊत, बंडू भारसाकळे, महादेव टेकाम यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
