
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, कामगार आणि बेरोजगार यांच्या न्यायहक्कांसाठी २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे भव्य आरपार आंदोलन होणार असून या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी, शेतमजूर व दिव्यांगांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे माजी राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू करणार आहेत.
शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात व दुर्लक्षित घटकांच्या मूलभूत हक्कांसाठी हा एल्गार उभारण्यात येत असून राज्यभरातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांच्या ७/१२ वरून कर्ज वजा करून ७/१२ कोरे करण्यात यावे.
शेतीमालास उत्पादन खर्चावर ५०% नफा धरून हमीभाव द्यावा व शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवावी.
दिव्यांगांना किमान ₹६,००० मासिक मानधन देण्यात यावे.
पेरणीपासून कापणीपर्यंतची शेतीकामे ‘रोजगार हमी’मध्ये समाविष्ट करावीत.
भंडारा जिल्ह्यात तलाव/धरण क्षेत्रात मच्छीमारांना कंत्राटांत प्राधान्य द्यावे.
गोसे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात.
गोसे जलाशय जलपर्यटन प्रकल्पांत प्रकल्पग्रस्तांना कंत्राट देवून रोजगार द्यावा.
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकनुकसानीवर कायमस्वरूपी उपाय व योग्य भरपाईची तरतूद करावी.
भूखंड नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावेत आणि सरकार मालक असलेल्या जमिनींवरही घरकुल योजना लागू करावी.
भंडारा शहराचा विस्तार लक्षात घेऊन खात रोड परिसरात नवीन क्रीडांगण उभारावे.
भेल किंवा अन्य औद्योगिक प्रकल्प सुरू करावा; अन्यथा अधिग्रहित जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी.
शिक्षण व आरोग्याचे खाजगीकरण न करता गरीब–श्रीमंत दोघांनाही सरकारी व्यवस्थेतून समान लाभ मिळेल अशी प्रणाली उभारावी.
चिंतामन तिभुडे यांनी या आंदोलनासाठी राज्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, कामगार व बेरोजगार बांधवांना आवाहन केले आहे की —
“आपल्या न्यायहक्कांसाठी २८ ऑक्टोबर रोजी नागपूरला एकत्र या!”
