
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, कामगार आणि बेरोजगारांच्या न्यायहक्कांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली “चलो नागपूर” या आरपार आंदोलनाचा बिगुल वाजला असून २८ ऑक्टोबर रोजी बुटीबोरी रोड, परसोडी (नागपूर) येथे हे आंदोलन भरणार आहे. या आंदोलनाला आता मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूरमध्ये बच्चू कडू गरजणार असताना मुंबईत मनोज जरांगे पाटील सरकारविरोधात हक्काची भूमिका मांडणार आहेत.
जरांगे पाटलांनी जाहीर केलेले धोरण लक्ष वेधून घेणारे आहे. ते म्हणाले की —
“शेतकरी आंदोलना दरम्यान शेतीची कामे रखडू नयेत म्हणून ‘अर्धे लोक आंदोलनात – अर्धे शेतीत’ हा नवा प्रयोग देश पाहणार आहे. एक घरातील दोन असतील तर एक आंदोलनात, एक शेतात; चार असतील तर दोन आंदोलनात, दोन शेतात. ही लढाई शांततेत होणार पण निकाल न्यायाचा लागल्याशिवाय मागे हटणार नाही.”
या आंदोलनात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे —
शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरची कर्जे पूर्ण कोरडी करावीत
शेतीमालास उत्पादनखर्चावर किमान ५०% नफा धरून हमीभाव
दिव्यांगांना किमान ₹६,००० मासिक मानधन
पेरणी ते कापणीपर्यंतची कृषी कामे रोजगार हमीत समाविष्ट
भंडारा जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रांत मच्छीमारांना कंत्राटात प्राधान्य
गोसे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तातडीने निकाली काढाव्यात
वन्यप्राण्यांच्या नुकसानीची कायमस्वरूपी भरपाई व्यवस्था
भूखंड नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावेत
सरकारी जमिनीवरील घरकुल योजनेला परवानगी
भंडारा खात रोड परिसरात नवीन क्रीडांगण
भेल वा पर्यायी औद्योगिक प्रकल्प अन्यथा अधिग्रहीत शेती परत
शिक्षण-आरोग्य खाजगीकरण न करता समान सरकारी सुविधा
भंडारा जिल्ह्यातील गावागावातून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी व इतर घटक एकत्र येत आहेत. मोहाडी तालुका नवेगाव-बूज ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष चिंतामण तिबुडे यांनी आवाहन केले की —
“बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आणि मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंब्याने न्यायहक्कासाठी अंतिम लढा द्यायचा आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले शब्द आता पाडणे भाग आहे. रक्ताची नाती बाजूला ठेवून सर्वांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सामील व्हा.”
