

सहसंपादक : रामभाऊ भोयर
अड्याळ टेकडी: दिनांक २७-२८ डिसेंबर २०२५ रोज भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे दोन दिवसीय आयुर्वेद व वनौषधी प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. २७ डिसेंबर रोज दुपारी १२ वाजता सत्संग भवन अड्याळ टेकडी येथे दीपप्रज्वलन व अधिष्ठान पूजन करून संचालक श्री सुबोधदादा, उद्घाटक डॉ सतीश गोगुलवार (कुरखेडा), शिबिर संयोजक डॉ गिरीश शेंडे, अध्यक्ष डॉ नवलाजी मुळे, डॉ आर के राखडे, डॉ नरेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डॉ गिरीश शेंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विषद केले. अड्याळ टेकडी अध्यक्ष डॉ नवलाजी मुळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
डॉ नरेश देशमुख यांनी त्वचा विकारावर, डॉ रामेश्वर राखडे यांनी वात विकार व स्वयंपाक घरातील औषधी या विषयावर डॉ श्वेताताई राखडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दिनचर्या व ऋतुचर्या विषयावर शिबिर संयोजक डॉ. गिरीश शेंडे यांनी मार्गदर्शन केले. सामुदायिक प्रार्थनेवर मार्गदर्शक श्री सुबोधदादा यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना सामुदायिक प्रार्थना हे कसे संस्कार, आरोग्य, संस्कृती, एकाग्रता व आपले धैर्य वाढविण्याचे एक महत्त्वपूर्ण अधिष्ठान आहे हे सांगितले.
२८ डिसेंबर ला सकाळी वैद्य चलाख व वैद्य प्रकाश उरकुडे यांच्या मार्गदर्शनात अड्याळ टेकडी वनौषधी सर्वे प्रशिक्षण घेण्यात आले. स्त्रियांचे रोग या विषयावर डॉ पल्लवी चिलबुले, गर्भसंस्कार संगोपन या विषयावर डॉ ऐश्वर्या ढोले (वरोरा), डोळ्यांचे आजार विषयावर डॉ रोहित चिलबुले व यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अंतिम समारोपीय सत्रात आयुर्वेद माध्यमातून रुग्ण चिकित्सा विषयावर डॉ. अनिल देशमुख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सुश्री रेखाताई व लक्ष्मीताई यांनी शिबिराची भोजन व्यवस्था सांभाळली. सदर शिबिरात चंद्रपुर , नागपूर, भंडारा, गडचिरोली, मुंबई, सातारा, नवनीतपूर, गोंदिया, यवतमाळ, इत्यादी जिल्हातून विविध लोकांनी सहभाग घेतला.
