
सहसंपादक: रामभाऊ भोयर
कला,वाणिज्य महाविद्यालय, राळेगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे दत्तक ग्राम वरूड जहागीर येथे २ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “शाश्वत विकासासाठी युवा : पाणलोट व्यवस्थापन आणि पडिक जमीन विकास” या थिमवर आधारित विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरादरम्यान दिनांक ८ फेब्रुवारी रोजी “जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन” या विषयावर बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विशाल दौलतकर यांनी केले. त्यांनी जलसंधारण व पर्यावरण यांचा निकटचा संबंध अधोरेखित करत पर्यावरण संवर्धनासाठी जलसंधारणावर कार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
मुख्य वक्ते मा. रुपेश रेंगे (पाणी फाउंडेशन पुरस्कार विजेता) यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी पावसाचे पाणी वाहून न जाता चंद्राकार चर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डे, वृक्षारोपण, ठाळीचे बांध, शेततळे, नदीनाल्यावर बंधारे अशा उपाययोजनांची माहिती दिली. युवकांमध्ये जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाची आवड निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. अनिल दौलतकर यांनी गावातील युवकांनी जलसंधारण व पर्यावरण संवर्धनासाठी सक्रीय सहभाग घेण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे संचालन दिव्या वाकुलकर (बी.ए. भाग २) हिने केले तर आभार प्रदर्शन संदीप खंदारे (बी.ए. भाग १) यांनी केले. या कार्यक्रमाला महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. शालिनी हटवार, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. धीरज गोबरे, माजी विद्यार्थी सुशील दांदडे, पंकज आत्राम, रासेयो स्वयंसेवक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे प्राथमिक शाळेतील लहान मुले व त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
अशा प्रकारे हे बौद्धिक सत्र रासेयो स्वयंसेवकांसाठी मार्गदर्शक ठरलेच, पण गावातील लहान मुलांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देणारे ठरले.
