
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राष्ट्रीय सेवा योजना, कला, वाणिज्य महाविद्यालय, राळेगाव यांच्या द्वारा डॉ भास्कर सावरकर यांच्या मार्गदर्शनात वरूड जहागीर येथे २ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “शाश्वत विकासासाठी युवा : पाणलोट व्यवस्थापन आणि पडिक जमीन विकास” या थिमवर आधारीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरादरम्यान दिनांक ७ फेब्रुवारी रोजी “सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी संस्कार केंद्र” या विषयावर बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विशाल दौलतकर यांनी केले. त्यांनी युवा पिढी संस्कारी व सुसंस्कृत घडविण्यासाठी बालकांवर योग्य संस्कार होणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
मुख्य वक्ते मा. मनोज ठाकरे (राष्ट्रीय युवा संघटन, सेवाग्राम) यांनी मार्गदर्शन करताना पायाभूत सुविधा पुरेशा नसून संस्कारीत पिढी घडविणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. माननीय विनोद देवतळे यांनी स्त्री-पुरुष समानतेचा विचार संस्कार केंद्र चालविताना पाळला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. मा. रुपेश रेंगे (पाणी फाउंडेशन पुरस्कार विजेता) यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. अनिल दौलतकर यांनी बालक हा मातीचा गोळा असून त्याला जसा आकार द्यावा तसा तो घडतो, असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन दिव्या वाकुलकर बी. ए भाग २ हिने केले तर, आभार प्रदर्शन संदीप खंदारे बी ए भाग १ यांने केले. या कार्यक्रमाला महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. शालिनी हटवार, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. धीरज गोबरे, माजी विद्यार्थी सुशील दांदडे, पंकज आत्राम, रासेयो स्वयंसेवक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे प्राथमिक शाळेतील लहान मुले व त्यांच्या पालकांचा या सत्राला उत्स्फूर्त सहभाग होता.
अशा प्रकारे हे बौद्धिक सत्र रासेयो स्वयंसेवकांसाठी मार्गदर्शक ठरलेच, पण गावातील लहान मुलांना संस्कारांचे महत्त्व पटवून देणारे ठरले.
