प्रतिनिधी//शेख रमजान
उमरखेड तालुक्यातील मानाच्या पाच ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या बिटरगाव (बु.) येथील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३६ नुसार, विहित मुदतीत मासिक सभा न घेतल्याचा ठपका ठेवत यवतमाळचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी उपसरपंच प्रकाश पेंधे यांना अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके प्रकरण काय?
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ऑगस्ट २०२३, ऑक्टोबर २०२३, डिसेंबर २०२३ या तीन महिन्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या मासिक सभांचे आयोजन करण्यात आले नव्हते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३६ मधील तरतुदीनुसार, ठराविक अंतराने सभा घेणे बंधनकारक असते. या कर्तव्यात कसूर केल्यामुळे, अॅड. विनोद नंदकुमार मामीडवार यांनी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात विवाद अर्ज दाखल केला होता.
न्यायालयीन प्रक्रिया आणि निकाल:
या प्रकरणावर सातत्याने सुनावणी सुरू होती. दि. ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी या अर्जावर अंतिम सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी काल, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी आपला अंतिम निकाल दिला. या आदेशानुसार, उपसरपंच प्रकाश पेंधे यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
या प्रकरणात अर्जदाराच्या वतीने अॅड. मंगेश गंगलवार आणि अॅड. विकास मोहोड यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
