
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा, यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीत महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून, संदीप पेंदोर यांची जिल्हा महामंत्री तसेच विधानसभा राळेगाव प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रफुलसिंह चौहाण, जिल्हा महामंत्री राजुभाऊ पडगीलवार, रेखाताई कोठेकार, राजीव पुंडलिकवार तसेच अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप मलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
संघटन वाढीसाठी, पक्ष बळकटीसाठी तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्यासाठी संदीप पेंदोर यांच्या खांद्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेणे, गरजूंना मदत करणे, युवकांना संघटित करणे तसेच विविध जनकल्याणकारी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग नोंदविणे ही त्यांची ओळख राहिली आहे.संदीप पेंदोर हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत विविध उपक्रम राबवून त्यांनी जनतेमध्ये आपुलकी निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे व संघटन कौशल्यामुळे ते या नव्या जबाबदारीला निश्चितच न्याय देतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.या नियुक्तीबद्दल राजकीय, सामाजिक तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
