
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य करणाऱ्या सगुणा रूरल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा ‘उत्कृष्ट शेती शाळा’ पुरस्कार येवती येथील प्रगतशील शेतकरी उमेश पोहंदरे यांना प्रदान करण्यात आला. नेरळ येथील प्रसिद्ध ‘सगुणा बाग’ येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान सोहळा पार पडला.
राज्यासह परराज्यातही ‘शेती शाळा क्र. ९’ चा डंका आहे. महाराष्ट्र राज्यात यंदा सगुणा रूरल फाउंडेशनच्या वतीने एकूण १७ शेती शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. यामध्ये उमेश पोहंदरे यांच्याकडे शेती शाळा क्रमांक ९ ची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पोहंदरे यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने ही शाळा केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष प्रयोगातून फुलवली.
अल्पावधीतच त्यांची ही शेती शाळा महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत लोकप्रिय झाली आहे. या शाळेत शिकवले जाणारे तंत्र आणि प्रत्यक्ष अनुभव पाहण्यासाठी या तिन्ही राज्यांतील शेतकरी मोठी गर्दी करत आहेत. शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि शाश्वत पद्धतीने शेती कशी करावी, याचे उत्कृष्ट मार्गदर्शन येथे दिले जाते. हा पुरस्कार सोहळा कृषी क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यामध्ये प्रामुख्याने चंद्रशेखर भडसावळे SRT (सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी) चे जनक व प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ.
मयंक गांधी ग्लोबल विकास ट्रस्टचे अध्यक्ष.
सौ. चिन्मयी देऊळगावकर: मॅनेजिंग डायरेक्टर, कंट्रोल युनियन इंडिया.
या मान्यवरांच्या हस्ते पोहंदरे यांना सन्मानित करण्यात आले. पोहंदरे यांच्या कार्यामुळे येवती गावाचे नाव कृषी नकाशावर ठळकपणे उमटले असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.
प्रतिक्रिया
“शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक आणि शाश्वत तंत्राचा वापर केल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरेल. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या शेती शाळेला भेट देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे.”
— उमेश पोहंदरे, पुरस्कार विजेते शेतकरी
