
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव ग्रामीण : एक ना धड भाराभर चिंध्या ‘ असा अनुभव शासकीय धोरणाबाबत येणे सर्वसामान्य माणसासाठी नवीन नाही, २०१७ च्या कर्जमाफी करता पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला हीच अवस्था आली आहे . पात्र शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी मिळाली नाही. २०१७मध्ये कर्जमाफीला पात्र ठरलेले शेतकरी आजही नव्याने कर्ज कधी मिळणार, या प्रतीक्षेत आहेत. मुळात २०१७मध्ये या शेतकऱ्यांच्या नावे जितके कर्ज होते. ते कर्ज ३०सप्टेंबर २०२५पर्यंत दुपटीने वाढले आहे. यासोबतच पुनर्गठीत कर्जाचे विविध हप्ते पाडले. ते कर्जही थकले आहे. वाढत्या व्याजामुळे कर्जाचा डोंगर तयार झाला आहे. त्यामुळे दोन लाखांची कर्जमाफी झाली तरी अशा शेतकऱ्यांपुढे अडचणीचा डाेंगर उभा आहे. याच प्रकरणात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
सन २०१७मध्ये तत्कालीन सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती. यावेळी ग्रिनलिस्टमध्ये आल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी समजले जात होते. यानुसार कर्जमाफीला पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची नावे ग्रिनलिस्टमध्ये प्रसिध्द झाली. मात्र, काही शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे बँकेत जमा झालेच नाहीत. या शेतकऱ्यांनी वारंवार बँकाच्या येर-झारा मारल्या. मात्र, कर्जमाफीचे पैसेच आले नाहीत. यामुळे २०१७ला पात्र ठरलेले कर्ज तसेच राहिले. हे कर्ज थकीत राहिल्याने शेतकऱ्यांना नव्याने कर्जच मिळाले नाही.
सन २०२५पर्यंत या थकीत कर्जावरील व्याज वाढून हे कर्ज मूळ रकमेपेक्षा दुप्पट झाले आहे. यातून या शेतकऱ्यांच्या कर्जाचा आकडा वाढला आहे. आता राज्य शासनाने घोषणा केल्यानुसार थकीत शेतकरी म्हणून हे शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरणार आहेत. मात्र, त्यांच्याकडील कर्ज दोन लाखांच्यावर पोहचले आहे. यातून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.५० हजारांचे कर्जही काही लाखांपर्यंत पोहचले आहे. हा संपूर्ण प्रकार चिंताजनक आहे. विनय नीलजकर आणि बाबासाहेब दरणे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. अध्यादेश काढण्यापूर्वी अशा कर्ज प्रकरणाचा विचार करावा, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
चौकट
…त्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळालेच नाही
सन २०१७मध्ये कर्जमाफीला पात्र ठरल्यानंतरही कर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब आजही अडचणीत आहे. कर्जमाफीचे पैसे जमा न झाल्याने या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळाले नाही. या शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे.
पुनर्गठण कर्जावरही वाढला डोंगर
कर्जमाफी करिता पात्र असतानाही जिल्ह्यातील हजारो शेतकरी सभासद माफी पासून वंचित आहे ,या साठी आम्ही कायदेशीर लढाई लढलो ,जिंकलो सुद्धा मात्र उच्च न्यायालयाचा निर्णय असतानाही टोलवाटोलवी सुरू आहे .आता मुख्यमंत्री यांनी नवीन कर्ज माफीची घोषणा केली ,आम्हाला जुन्याच कर्ज माफीचा लाभ अजूनही मिळालेला नाही हा अन्याय आहे .
सन २०१७मध्ये कर्जमाफीपूर्वी काही शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. कर्जपुनर्गठन झाल्याने या कर्जावरही थकीत कर्ज आणि व्याज वाढून हे कर्ज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बँकांनी या कर्जावर व्याज वाढविल्याने आकडा फुगल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बाबासाहेब दरणे
हिवरा( द)
