
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव, :— तालुक्यातील वाऱ्हा येथे जादूटोण्याच्या संशयातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राळेगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदिती पुंडलिकराव अराडे (वय १९, रा. वाऱ्हा ता. राळेगाव) हिने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रभाकर उदेभान मांडरे (वय ५५), अमोल प्रभाकर मांडरे (वय ३०), भास्कर उदेभान मांडरे (वय ५०) तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक (सर्व रा. वाऱ्हा ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २३) सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची आई सुरेखा उर्फ मेधा पुंडलिकराव अराडे अंगण साफ करीत असताना आरोपी अमोल मांडरे हा हातातकाठी घेऊन त्यांच्या घरासमोर आला व तुमच्या जादूटोण्यामुळे आमच्या घराचा सत्यनाश झाला, असा आरोप करीत आईवर काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. आईच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून वडील पुंडलिकराव अराडे हे घराबाहेर आले असता आरोपीने त्यांनाही बेदम मारहाण केली. यावेळी अमोलचा नातेवाइक प्रभाकर मांडरे हा लोखंडी सत्तूर घेऊन आला व सुरेखा अराडे यांच्या गळ्यावर वार केला. तसेच चेतन मांडरे याने तिचे हात धरून मारहाणीत मदत केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात आदितीच्या आईच्या मानेवर गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दरम्यान, तिच्या वडिलांनाही काठ्यांनी मारहाण करण्यात आली. दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. घटनेनंतर आरोपींनी शिवीगाळ करीत कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी राळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींना रात्रीच पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले.
