सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव: येथील ‘भील बालिका कालीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’मधील पदभरती प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी आता वादाच्या भोऱ्यात सापडली आहे. विशेष म्हणजे, ज्या श्री प्रवीण वासुदेव गुल्हाने प्राचार्यांविरुद्ध तक्रार आहे, त्यांनीच वरिष्ठ कार्यालयाचे आदेश डावलून स्वतःची समांतर चौकशी समिती नेमल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश कुबडे या युवकाने पदभरतीमध्ये अनुच्छेद १४ व १६ चे उल्लंघन झाल्याची तक्रार जिल्हा स्तरावर केली होती. त्यावर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, श्री महेशकुमार शिडाम यवतमाळ यांनी फेब्रुवारी महिन्यात स्वतःच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, ही चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच, संबंधित प्राचार्यांनी मार्च महिन्यात दुसऱ्या एका समितीची नियुक्ती केली. तक्रारदाराला या नवीन चौकशीची साधी सूचनाही देण्यात आली नाही. आरोप झालेल्या प्राचार्यांनी स्वतःची चौकशी करण्यासाठी समिती नेमल्याने या प्रकरणातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.
