
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पांढरंकवडा :ग्रामीण भागात आजही अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य, विशेषतः ‘बांबूची तुराटी’ किंवा लाकडे गोळा करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण ओळखून मोहदा येथील धोबी समाज बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाला अंत्यसंस्कारासाठी कायमस्वरूपी ‘स्टील मयत शिडी’ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या स्तुत्य उपक्रमाचे लोकार्पण नुकतेच पार पडले. यावेळी धोबी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू गायकवाड, मोहदा गावचे सरपंच अक्षय मेश्राम, पोलीस पाटील पियुष गबराणी यांच्यासह धोबी समाजातील समस्त बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अडचणीवर कायमस्वरूपी मात
ग्रामीण भागात एखाद्याच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी तिरडी तयार करण्यासाठी बांबू किंवा तुराटी वेळेवर उपलब्ध होईलच असे नाही. अशा वेळी कुटुंबाची होणारी ओढाताण थांबवण्यासाठी धोबी समाजाने पुढाकार घेतला. स्टीलची शिडी उपलब्ध झाल्यामुळे आता ही प्रक्रिया सुलभ होणार असून, हा एक आदर्श वस्तुपाठ इतर समाजासाठीही ठरला आहे.
मान्यवरांचे कौतुक
यावेळी बोलताना सरपंच अक्षय मेश्राम व पोलीस पाटील पियुष गबराणी यांनी धोबी समाजाच्या या कार्याचे विशेष कौतुक केले. केवळ आपल्या समाजाचा विचार न करता संपूर्ण गावाच्या उपयोगाची वस्तू भेट देऊन धोबी समाजाने समाजाप्रती असलेले आपले उत्तरदायित्व सिद्ध केले आहे, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या उपक्रमासाठी धोबी समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले असून, संपूर्ण गावातून त्यांच्या या कार्याचा गौरव होत आहे.
