
(प्रतिनिधी) शेख रमजान
शेतातील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा स्टार्टरमध्ये करंट उतरून विजेचा तीव्र धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संतोष वसराम चव्हाण (वय ४५, रा. मेट) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण हे शनिवारी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास आपल्या शेतात काम करत होते. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी ते विहिरीवरील विद्युत मोटार पंप सुरू करण्यासाठी गेले. मात्र, अचानक स्टार्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का लागला.विजेचा धक्का लागल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे मेट परिसरात आणि चव्हाण कुटुंबावर तीव्र शोककळा पसरली आहे.याप्रकरणी अश्विन सखाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
