
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू झाली असून प्रवासी मोठ्या प्रमाणात बसने प्रवास करतात. त्यासाठी राळेगाव व शेजारच्या आगारानी लांब पल्ल्याच्या बसेस सुरू कराव्यात अशी मागणी राळेगाव तालुका ग्राहक पंचायतच्या वतीने आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राळेगाव आगारातून लांब पल्ल्याच्या काही गाड्या एकच फेरी करीत असल्याने व त्या मार्गावर बसेस सोडल्या जात नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. राळेगाव आगाराची राळेगाव नागपूर बस सकाळी सात वाजता आहे. त्यानंतर साडेसात व साडेआठ वाजता हिंगणघाट व वर्धा मार्गे व शिरसगाव, अल्लीपूर, मदनी, हिंगणा फाटा मार्गे नागपूर करता जलद वातानुकूलित बसेस सुरू करावी , हिंगणघाट वर्धा डेपोतून शिवशाही बस येतात. त्या नागपूरपर्यंत वाढविण्यात याव्या.
चंद्रपूर करीता दुपारी एक ते दोनच्या दरम्यान सुरू असलेली बस बंद करण्यात आलेली आहे. ती पुन्हा सुरू करावी, चंद्रपूर करीता घुग्गुस व मानढळी, वरोरा मार्गे बस सुरू करावी, तसेच हिंगणघाट ते यवतमाळ, येवती, वडकी मार्गे जाणारी बस अनेक दिवसापासून बंद करण्यात आली आहे. ती पूर्ववत सुरू करण्यात यावी. यवतमाळ वरून राळेगाव करीता येणारी व राळेगाव वरून यवतमाळ करिता जाणारी शेवटची बस रात्री नऊ वाजता सुरू करण्यात यावी तसेच पांढरकवडा कडे जाण्यासाठी एकही बस नसल्याने पांढरकवडा रावेरी, पिंपळखुटी, वरूड, मोहदामार्गे पांढरकवडा करता दोन टायमिंग सुरू करण्यात यावे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकडे व तिकडून यवतमाळकडे जाणारे रात्रीचे किमान एक ते दोन टाइमिंग राळेगांव मार्गे सुरु करण्यात यावे.
सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरू करण्यात येणाऱ्या बसेसच्या नवीन वेळेची व रद्द करण्यात आलेल्या वेळेची माहिती चौकशी कक्षा समोर प्रदर्शित करण्यात यावी. व वर्तमानपत्रांना सुद्धा याबाबतची माहिती देण्यात यावी.
प्रवाशांकरता पिण्याच्या शुद्ध व थंड पाण्याची मशीन दुरुस्त करून प्रवाशांना स्वच्छ व थंड पाणी नियमित मिळेल याबाबत कारवाई करण्यात यावी.
राळेगाव आगारात चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांकरता थंड व स्वच्छ व शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
अशी मागणी निवेदनातून राळेगाव तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली असून अशा आशयाचे निवेदन आगार प्रमुख शशिकांत बोकडे यांना ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. के एस वर्मा, ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष मोहन देशमुख, सचिव गोपाल बुरले, सदस्य हेमंत निंबुळकर आदीच्या वतीने देण्यात आले आहे.
जिल्हा नियंत्रक, यवतमाळ,
जिल्हा नियंत्रक, वर्धा,
जिल्हा नियंत्रक,चंद्रपूर,
आगार प्रमुख, हिंगणघाट यांना निवेदने पाठविण्यात आली आहे.
