
“
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राष्ट्रसेवा व समाजीक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी पॅरा कमांडो श्री योगेश्वर राठोड यांना वर्ष 2026 चा “राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातृसम्मान पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या समर्पण, कर्तव्यनिष्ठा, चिकाटी व निस्वार्थ सेवा भावनेची दखल घेऊन देण्यात आला.
श्री राठोड यांनी भारतीय सैन्यात पॅरा कमांडो म्हणून सेवा बजावताना देशाप्रती आपली प्रामाणिकता, शिस्त व राष्ट्रभक्तीचे उत्तम उदाहरण घालून दिले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात सक्रिय राहून जनकल्याणाच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान दिले आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना श्री राठोड म्हणाले –
“भारतीय सैन्यात सेवा करत असताना मी पूर्ण प्रामाणिकपणे व निस्वार्थ भावनेने देशाची सेवा केली आहे. आता त्याच सेवा भावनेतून समाजकल्याणासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. कर्तव्यनिष्ठा, चिकाटी आणि सेवा हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे.”
यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, भविष्यातही समाजहितासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनकल्याणाचे कार्य सतत सुरू ठेवणार आहेत.
