
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
“|| ॐ शं शनैश्चराय नमः || जय शनि देव ||” या जयघोषात राळेगाव तालुक्यातील खैरी गावात श्री शनिदेव जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शनिदेव भक्तगण व समस्त खैरी ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १६ मे २०२६ रोजी खैरी येथील शनी मंदिर प्रांगणात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण गाव धार्मिक आणि भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाले आहे.या उत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक १५ मे रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीपर्यंत वारकरी भजन मंडळाच्या जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि अभंगांच्या सुरावटीत संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात रंगून जाणार आहे.
शनिवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ८:३० ते ११:३० या वेळेत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. यामध्ये कलश स्थापना, गणपती पूजन, श्री शिव-हनुमंत पूजन, आदित्य शतनामावली सूर्य पूजन, श्री शनेश्वर अभंग स्नान, महापूजा व अभिषेक, मूर्ती सजावट, वस्त्राभूषण तसेच होम-हवन यांचा समावेश आहे. या धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात अध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
त्यानंतर सकाळी ११:३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाकाल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले असून, किर्तनातून भक्तांना अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे. दुपारी ३ वाजल्यापासून महाप्रसाद वितरणास सुरुवात होणार असून, परिसरातील हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शनिदेव जयंतीनिमित्त मंदिर परिसर आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि धार्मिक वातावरणाने उजळून निघणार असून, खैरी गावासाठी हा उत्सव विशेष आकर्षण ठरणार आहे. श्रद्धा, भक्ती, सामाजिक एकोपा आणि अन्नदानाची परंपरा जपणारा हा धार्मिक सोहळा भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.कार्यक्रम आयोजकांनी परिसरातील सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच अन्नदानाच्या माध्यमातून सहकार्य करू इच्छिणाऱ्या भाविकांनी १६ मेपूर्वी आयोजकांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.
