
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन, पुणे आयोजित “निमंत्रितांची काव्यमैफिल व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026” हा कार्यक्रम रविवार, दि. 28 जून 2026 रोजी अशोका व्हेज रेजन्सी, सरोली वडमुखवाडी, आळंदी रोड, पुणे येथे मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून मान्यवर कवी, साहित्यिक, समाजसेवक व विविध क्षेत्रातील पारंगत व्यक्ती उपस्थित होत्या. प्रथम सत्रात कवी संमेलनाचे अध्यक्ष मा.प्रा.डॉ. शैलेंद्र भगणे होते, तर द्वितीय सत्रातील पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षपद मा.प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भूषवले.सोजाई फाउंडेशन – सेवा हेच ध्येय
सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचे व्रत घेऊन कार्यरत आहे. संस्थेच्या उल्लेखनीय उपक्रमांमध्ये:
- आरोग्य सेवा: गोरगरिबांना मोफत उपचार. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास तेथे जाऊन रुग्णांचे अवाढव्य बिल माफ करून घेण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेते.
- शिक्षण व संगोपन: अनाथ आश्रमातील 50 मुलांचे संगोपन फाउंडेशन स्वखर्चाने करते. या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च व आरोग्याची जबाबदारी संस्था उचलते.
- कमवा आणि शिका योजना: आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबलेल्या मुलींसाठी फाउंडेशन माफक दरात ANM, GNM, B.Sc Nursing DMLT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे क्लासेस चालवते.
- कलाकारांचा सन्मान: आपापल्या क्षेत्रात पारंगत असणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी फाउंडेशन विविध उपक्रम राबवते. या पुरस्कार सोहळ्यातूनच कलाकारांचा सन्मान होतो.
कार्यक्रमाचा विशेष आकर्षण
यावेळी ज्ञानदीप बालगृह आश्रमातील अनाथ मुलांनी “हिरकणी” थीमवर दमदार नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या तालबद्ध ठेक्यांनी आणि भावपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमून गेलं. या अफलातून सादरीकरणासाठी त्यांना “एकता नृत्य पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
या संपूर्ण नृत्य सादरीकरणामागील खरे शिल्पकार म्हणजे नृत्यदिग्दर्शक ओमकार सरोदे सर. त्यांच्या मेहनतीमुळे आणि मार्गदर्शनामुळे या मुलांनी असा जिवंत ठसा उमटवला. त्यांच्या योगदानाबद्दल ओमकार सरोदे यांना “उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे पदाधिकारी
या सर्व सामाजिक कार्यामागे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अहोरात्र कष्ट आहेत:
- अध्यक्ष: मा. डॉ. प्रशांत डी. चव्हाण
- उपाध्यक्ष: मा. डॉ. ओंकार चव्हाण
- सचिव: मा. ॲड. जयश्री बी. सोनवणे
- खजिनदार: मा. श्रीमती. द्रोपदी सोनवणे
- सदस्य: मा. श्रीमती. संगीता बोरुडे
- सदस्य: मा. श्री. दत्तात्रय चव्हाण
- सदस्य: मा. सौ. लताबाई चव्हाण
त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली फाउंडेशन सेवा, शिक्षण आणि संस्कृती या त्रिसूत्रीने कार्यरत आहे.कार्यक्रमाचे निवेदन प्रथम सत्रात रानकवी जगदीप वनशिव आणि द्वितीय सत्रात लोककवी सीताराम नरके, राष्ट्रीय पोलीस पदक मानकरी यांनी केले.सोजाई फाउंडेशनच्या कार्याला सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
