
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे
दिनांक १६ मे २०२६ रोजी “बळीराजा पाणी वापर संस्था” यांच्या वतीने ज्ञानसाधना शिक्षण संस्था यवतमाळ व पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लाभधारक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पाणी वापर संस्था बळकट करणे, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच बदलत्या परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल घडवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानसाधना शिक्षण संस्थेच्या प्रशिक्षक मोनिका देशमुख मॅडम यांनी पाणी वापर संस्थेची प्रस्तावना सभेसमोर मांडली. लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी प्रशिक्षक व सहप्रशिक्षकांना सहकार्य करावे, पाणी वापर संस्था सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यानंतर ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक मेघावत सर यांनी पाणी वापर संस्थेचे महत्त्व, कार्यपद्धती तसेच लाभधारक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर सखोल मार्गदर्शन केले. पाणी वापर संस्था ही केवळ पाण्याचे नियोजन करणारी संस्था नसून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणारी प्रभावी यंत्रणा असल्याचे त्यांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांची जबाबदारी काय असते, संस्था गावपातळीवर कशा पद्धतीने प्रभावीपणे कार्य करू शकते तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारी संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे पाठवून त्यांचे निराकरण कसे करता येते याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, महिला बचत गटांसाठीच्या योजना, वृद्धांसाठीच्या योजना, विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांविषयीही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष येरणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पाटबंधारे विभागाने काही महत्त्वाची प्रलंबित कामे पुढील एक ते दीड महिन्यांत पूर्ण करून दिल्यास पाणी वापर संस्था हस्तांतरित करण्यास आम्ही पूर्णतः तयार आहोत, असे स्पष्ट प्रतिपादन केले. तसेच लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास त्यांनी थेट माझ्याकडे तक्रारी द्याव्यात, त्यांचे योग्य निराकरण करण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील, असे आश्वासनही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
यानंतर ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे कृषी मार्गदर्शक प्रदीप भगत यांनी पीक पद्धतीत बदल करण्याची आजची गरज अधोरेखित करताना जमिनीचे वाढते नुकसान, घटत चाललेला सेंद्रिय कर्ब आणि रासायनिक शेतीमुळे जमिनीची होत असलेली हानी यावर सखोल भाष्य केले. पारंपारिक पिकांवर पूर्णतः अवलंबून न राहता बदलत्या हवामानानुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी आधुनिक व पर्यायी पिकांचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हळद लागवड, मोरिंगा लागवड तसेच चिया सीड्स लागवडीविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी या पिकांची वाढती बाजारपेठ, निर्यातक्षम क्षमता व आर्थिक फायदे यांची माहिती दिली. मोरिंगा पावडरचे आरोग्यदायी गुणधर्म, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती मागणी तसेच हळदीचे औषधी व आर्थिक महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी भगत सरांनी पंजाब राज्याचे उदाहरण देत सतत रासायनिक शेतीमुळे जमिनी कशा नापीक होत आहेत यावर भाष्य केले. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे, सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि शाश्वत शेतीकडे वळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आज जर आपण जमिनीची काळजी घेतली नाही तर भविष्यात शेती बंजर होण्याचा धोका निर्माण होईल,” असा सतर्कतेचा इशाराही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सचिव आदरणीय मनीष भानवे सर यांच्या प्रेरणेतून संस्था शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपाययोजना राबवून गावागावातील लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचेही नमूद करण्यात आले.
या कार्यशाळेस पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष येरणे, सदस्य निलेश गुजरकर, मोहन मधुकर बेहरे, मीराबाई कडूजी कुंबरे, सचिव प्रशांतभाऊ लक्ष्मणराव भंडारे, अमोल राजकुमार जाधव, सौ. मंगलाताई उत्तमराव गुजरकर (कृषी सखी राळेगाव), सौ. सुनीता सुरेश महाजन (अध्यक्ष महिला बचत गट), सौ. मनीषा नामदेव मडावी, श्री नागोरावजी बेहरे, नामदेवराव मांडवकर, राजूभाऊ टेकाम, संजयभाऊ बेहरे तसेच गावातील लाभार्थी शेतकरी, महिला बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक मेघावत सर, कृषी मार्गदर्शक प्रदीप भगत सर, प्रशिक्षक मोनिका देशमुख मॅडम व सहप्रशिक्षक आत्राम सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री निलेश गुजरकर यांनी केले.
या मार्गदर्शन कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांमध्ये पाणी व्यवस्थापन, शाश्वत शेती, सेंद्रिय शेती व आधुनिक पीक पद्धतीविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले.
